मुंबई/प्रतिनिधी
शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसल्याचं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. पाटील यांच्या या विधानाचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी जुन्नर येथील एका कार्यक्रमात चांगलाच समाचार घेतला. आम्ही समोरून कोथळा काढतो. पाठीत खंजीर खुपसत नाही. आम्हाला बाळासाहेबांनी हे घाणेरडं काम कधीच शिकवलं नाही, असा घणाघाती हल्ला संजय राऊत यांनी चंद्रकांतदादांवर चढवला होता. आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे.
शनिवार संजय राऊत यांनी जुन्नर येथील एका कार्यक्रमात बोलताना, चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसला असल्याच्या केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले होते. आम्ही समोरून कोथळा काढतो मागून नाही. पाठीमागून वार करण्याची शिवसेनेची परंपरा नाही. असं संजय राऊत म्हणाले होते. तसेच, शब्द तुम्ही फिरवला आम्ही नाही, असं देखील यावेळी त्यांनी बोलून दाखवलं होतं. त्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांवर पलटवार केला आहे. पाटील यांनी “कोथळा काढायला हातात जे शस्त्र घ्यायला लागते ते पेलवण्यासाठी विश्वासघातक्यांच्या दंडात ताकद आहे का? असं ट्विट त्यांनी केलं आहे.

“कोथळा काढायला हातात जे शस्त्र घ्यायला लागते ते पेलवण्यासाठी विश्वासघातक्यांच्या दंडात ताकद आहे का? आता भाजप प्रामाणिक मित्रपक्षांसोबतच येणाऱ्या सर्व निवडणूका लढेल आणि जिंकेल!” असं चंद्रकांत पाटील यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे. मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत हे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या निशाण्यावर आहेत.








