पुणे / प्रतिनिधी :
कोथरुडमध्ये वास्तव्यास असलेल्या डॉ. श्रीराम लागू यांचे फिरायला जाण्यासाठीचे आवडते ठिकाण म्हणजे एआरएआयची टेकडी… येथील एका बाकावर ते बसलेले असल्याचे अनेकांनी पाहिलेले आहे. याच ठिकाणी त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याबरोबरच त्यांच्या अभिनय कारकिर्दीस मानाचा मुजरा करण्यासाठी स्मृतिवृक्ष लावण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
‘नटसम्राट’ डॉ. श्रीराम लागू यांचे एक महिन्यापूर्वी निधन झाले. मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टी व नाटय़क्षेत्रात आपल्या अभिनयाची छाप पाडून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे डॉ. श्रीराम लागू यांचा प्रत्येक मराठी व्यक्तीला अभिमान आहे. या वेळी डॉ. दीपा लागू, संदीप खरे, डॉ. मोहन आगाशे, सतीश आळेकर, श्रीरंग गोडबोले, चंद्रकांत काळे, सुनील बर्वे, ज्योती सुभाष, मिलिंद जोशी, अरुणा ढेरे, वसंत वसंत लिमये व लागू परिवार आदी मान्यवर उपस्थित राहून कविता सादर करणार आहेत. तरी या भावस्पर्शी कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन कोथरुडच्या माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी केले आहे. डॉ. लागू हे पुण्यात राहत होते. एआरएआयच्या टेकडीवर फिरायला जाणारे डॉ. लागू एका बाकावर बसत. त्याच परिचित बाकाजवळ येत्या 19 जानेवारी ला सकाळी 7.30 वाजता वृक्षारोपणाचा कार्यक्रम होणार आहे.









