द्वारकेत परतलेल्या बलराम व कृष्णाने सत्राजिताच्या खुनाविषयी कसून चौकशी केली तेव्हा त्यांना समजले की हा खून शतधन्व्यानेच केलेला आहे. कृष्णाने सत्यभामेचे डोळे पुसले व प्रतिज्ञा केली-शतधन्व्याने सत्राजिताची जी अवस्था केली तीच अवस्था मी त्याची करेन. रात्री घरावर दरोडा टाकून खून करून स्यमंतकमणी चोरणारा शतधन्वा हा आततायी असल्याने मृत्यूदंडाला पात्र आहे. त्याला मारल्याने मला कोणतेही पाप लागणार नाही. भगवंताने केलेली प्रतिज्ञा शतधन्व्याला समजली त्यावेळी तो भयभीत झाला. घाबरून जाऊन त्याने काय केले पहा –
तोही जाणोनि कृष्णोद्यम । भयें संत्रस्त जाला परम ।
प्राण वांचवावयाचा काम । धरूनि क्षेम इच्छितसे ।
शतधन्वा तैं आपुले प्राण । वांचवावयाचे इच्छेकरून । कृतवर्म्याप्रति जाऊन । साह्य हो म्हणोन याचितसे । कृष्ण पवर्तला माझिया घाता । कोण्ही रक्षक न दिसे आतां । तुम्ही करूनियां साह्यता । माझिया जीविता रक्षावें । आपला जीव प्रत्येकाला प्यारा असतो. जीव वाचला तरच सर्व सुख संपत्ती भोगता येईल. कृष्णाची प्रतिज्ञेची वार्ता ऐकून शतधन्वा धावतच कृतवर्म्याकडे आला. त्याने कृतवर्म्याचे पाय धरले व काकुळतीला येऊन त्याला म्हणाला-महाबाहो! मला वाचवा! कृष्णाने माझा वध करण्याची प्रतिज्ञा केली आहे. आता माझे रक्षण करणारे कोणी दिसत नाही. तरी आपण कृपया मला सहाय्य करून माझ्या जीवाचे रक्षण करावे.
ऐकोनि शतधन्व्याचा शब्द । हांसिला कृतवर्मा खदखद ।
म्हणे तूं कैसा बुद्धिमंद । पाडिलें द्वंद्व कृष्णेंसीं ।
अरे हे बलभद्र चक्रपाणि । प्रत्यक्ष ईश्वरावतार दोन्ही । ऐसें म्हणों न शके वाणी । जे ईश्वरालागूनि नियंते हे । सागरगर्भीं द्वारकापुर । निर्मू शके कोण पामर ।
सुधर्मा अर्पूनि अमरेश्वर । ति÷s किंकर होत्साता ।
शक्ती दंडि खङ्गी पाशी । चापी गदी ईशानेंसीं ।
आज्ञा वंदूनिया शीर्षीं । नतमौळेंसीं जुहारिती ।
सुनंदपाणि चक्रपाणि । हे ईश्वराचे ईश्वर दोन्ही ।
यांची अवज्ञा माझेनी । कायवाड्मनीं न कल्पवे ।
यांतें सामान्यता मानून । माझेनि न करवेंचि हेलन ।
अथवा हो कां आणिखी कोण । जो विरुद्धाचरण करी यांशीं । यांचा करूनियां अपराध । यांसि चालवूनियां विरोध । ऐसा त्रिजगीं कोण प्रबुद्ध । जें कल्याण प्रसिद्ध पावेल । तस्मात् यांचे जे अपराधी । तेचि केवळ अभद्रनिधि । दु:खदोषांची समृधि । तिहीं त्रिशुद्धि संग्रहिली । यालागि माझेनि ईश्वरांसी । विरोध न करवेचि मानसीं । यांचे प्रताप तूं परियेसीं । देखोनि कैसी तुज भ्रांति ।
भीतीने गाळण उडालेल्या शतधन्व्याचे काकुळतीचे ते बोलणे ऐकून कृतवर्मा खदखदा हसू लागला. तो हसतच शतधन्व्याला म्हणाला-शतधन्व्या! तू असा कसा रे मंदबुद्धी आहेस? कृष्णाशी स्वतःहून कोण वैर पत्करेल काय? अरे! हे बलराम व कृष्ण हे केवळ ईश्वरी अवतारच नव्हेत तर देवांचेही देव, नियंते आहेत.
देवदत्त परुळेकर








