मध्यवर्ती म. ए. समिती ठाम : व्हॅक्सिन डेपो येथे मुहूर्तमेढ
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावमध्ये होणाऱया विधानसभेच्या अधिवेशनाचा निषेध म्हणून मराठी भाषिक महामेळावा आयोजित करतात. हा महामेळावा होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून आडकाठी घालण्याचे प्रयत्न केले जात आहेत. परवानगी मिळो अथवा ना मिळो दि. 13 रोजी महामेळावा होणारच या भूमिकेवर मध्यवर्ती म. ए. समिती ठाम आहे. शुक्रवारी व्हॅक्सिन डेपो मैदानावर महामेळाव्याची मुहूर्तमेढ करण्यात आली.
ज्या-ज्या वेळी बेळगावमध्ये अधिवेशन भरविले जाते त्या-त्या वेळी मराठी भाषिक महामेळावा घेऊन आपली भाषिक अस्मिता दाखवून देतात. अधिवेशनाला विरोध करून मराठी भाषिक आपले मेळाव्याच्या माध्यमातून अधिवेशन भरवितात. यापूर्वीच्या मेळाव्यांना महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी उपस्थित राहिली आहे. यावेळीदेखील नेतेमंडळींना निमंत्रण देण्यात आले आहे. व्हॅक्सिन डेपो मैदानाकडे जाणाऱया मार्गावर हा मेळावा भरविला जातो. मेळाव्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने म. ए. समितीने यासाठी कंबर कसली आहे.
शुक्रवारी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मुहूर्तमेढ रोवण्यात आली. अद्याप पोलीस प्रशासनाने परवानगी दिलेली नसली तरी महामेळावा घेणारच, असा निर्धार म. ए. समितीने केला आहे. महामेळाव्यासाठी गावोगावी जागृती केली जात आहे.
यावेळी मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, खजिनदार प्रकाश मरगाळे, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, युवा आघाडी अध्यक्ष संतोष मंडलिक, एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, राजकुमार बोकडे, श्रीकांत कदम, गणेश दड्डीकर, बापू भडांगे, मनोहर हुंदरे, शांताराम होसुरकर यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.









