प्रतिनिधी/ बेळगाव
कणबर्गी येथील 163 एकर जमीन बुडा हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. या जमिनीचा आराखडा तयार करून तो पाठविण्यात आला आहे. मात्र, शेतकऱयांना विश्वासात न घेता ही जमीन हिसकावून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे कणबर्गी येथील शेतकऱयांनी बुडा कार्यालयावर मोर्चा काढून आयुक्तांना निवेदन दिले.
कणबर्गी येथील शेतकऱयांनी बुडाला जमीन देण्यास विरोध दर्शविला होता. 2007 मध्ये नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यानंतरही या परिसरातील जमिनी काही जणांनी खरेदी-विक्री केल्या आहेत. त्यामुळे आता जमीन घेणे कायद्यात बसत नाही. तेव्हा जमिनीचा हट्ट सोडा, असे कणबर्गी येथील शेतकऱयांनी बुडा आयुक्तांना सांगितले.
प्रारंभी बुडा आयुक्तांनी आम्ही कोणतीच जमीन घेणार नसल्याचे सांगितले. मात्र, बुडाच्या बैठकीमध्ये जमीन घेण्याचा निर्णय झाल्याचे शेतकऱयांनी सांगितले. त्यावर बुडा आयुक्त शशिधर कुरेर यांनी तुम्हाला चुकीची माहिती मिळाली आहे, असे सांगितले. काही शेतकऱयांनी आम्हाला जमीन देण्याची तयारी दर्शविल्याचे सांगितले. मात्र, 30 शेतकऱयांनी कोणत्याही परिस्थितीत आम्ही जमीन देणार नाही, असे सुनावले आहे.
यावेळी बबन मालाई, संजय इनामदार, किसन सुंठकर, रामा दसका, मारुती मालाई, प्रकाश नाईक, महावीर गौडर, पुंडलिक अष्टेकर, उमाजी हलगेकर, बाबू बिर्जे, टोपाण्णा अष्टेकर, मनोहर मालाई, भैराप्पा अष्टेकर, नारायण अष्टेकर, बाळू हिरोजी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.









