वारणानगर/प्रतिनिधी
कोडोली (ता.पन्हाळा) येथील सरपंचपदी शंकर लालासो पाटील यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा कोडोलीचे मंडल अधिकारी अभिजित पोवार यांनी ही निवड जाहीर केली. सरपंच नितीन कापरे यांनी राजीनामा दिल्याने कोडोलीचे सरपंच पद रिक्त झाले होते. या जागेसाठी आज झालेल्या निवडणूकीत सदस्य शंकर पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने तसेच मुदत संपेपर्यन्त कोणीही अर्ज दाखल न केल्याने शंकर पाटील यांची सरपंचपदी निवड झाली. यावेळी पाटील समर्थकानी गुलालाची उधळण करीत फटाक्यांची आतषबाजी करत एकच जल्लोष केला.
सन २०१५ मध्ये पार पडलेल्या कोडोली ग्रामपंचायत निवडणुकीत माजी मंत्री आमदार विनय कोरे याच्या कोरे गटाचे निर्विवाद सत्ता होती. सर्व विजयी सदस्यांना नेतृत्व संधी प्राप्त करून देणेसाठी ठरल्याप्रमाणे नितीन कापरे यांनी राजीनामा दिला होता. निवडीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत पोवार, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तलाठी अनिल पोवार, निवड प्रक्रियेचे सूत्रसंचालक ग्रामविकास अधिकारी ए.वाय. कदम यांचे निवडणूक सुरळीत पार पडल्याबद्दल आभार व्यक्त केले. तर नूतन सरपंच पाटील यांच्या भावी वाटचालीस माजी सरपंच नितीन कापरे यांनी शुभेच्छा दिल्या.
नूतन सरपंच पाटील यांचा यावेळी मंडल अधिकारी अभिजीत पोवार, तलाठी अनिल पोवार, ग्रामविकास अधिकारी ए.वाय. कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हापरिषदेचे समाजकल्याण सभापती विशांत महापूरे, जि.प.चे.माजी सदस्य डॉ.बी.टी. साळोखे, वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचासक सुभाष पाटील, सुरेश पाटील, वारणा दूध संघाचे संचालक शिवाजीराव कापरे, अॅड. राजेद्र पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार केला उपसरपंच निखील पाटील यानी आभार मानले.