प्रतिनिधी / वारणानगर
कोडोली ता. पन्हाळा येथील ग्रामपंचायतीच्या वतीने लोकवर्गणीतून साकारलेल्या शववाहिकेचे लोकार्पण प्रजासत्ताकदिनी आमदार विनय कोरे व माजी शिक्षण सभापती अमरसिंह पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. ग्रामपंचायतीने या उपलब्ध केलेल्या सुविधाचे नागरिकातून स्वागत होत आहे.
ग्रामपंचायतीच्या प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमात या शव वाहिकेचे वैकुंठ रथ असे नामकरण करण्यात आले. यावेळी स्मशानभूमी कायम स्वच्छ ठेवणारे बाळू शिवा गायकवाड यांचा सत्कार आ. कोरे यांच्या हस्ते करण्यात आला. ग्रामसेवक ए. वाय. कदम यांनी प्रास्तविक करत ग्रामपंचायतीने केलेल्या कामांचा आढावा घेतला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते आयुष्यमान भारतचे कार्ड व दिव्यांग पाच टक्के निधीचे वाटप करण्यात आले.
यावेळी सरपंच शंकर पाटील, उपसरपंच निखिल पाटील, वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुभाष पाटील, वारणा दूध संघाचे संचालक शिवाजी कापरे, वारणा बँकेचे संचालक डॉ. प्रशांत जमणे, जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती विशांत महापुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य बी. टी.साळोखे, माजी सरपंच नितीन कापरे, कोडोली अर्बन बँकेचे चेअरमन राहुल पाटील, कोडोली नागरी सह. पतसंस्थेचे चेअरमन धीरज पाटील यांच्या सह सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. आभार उपसरपंच निखिल पाटील यांनी मानले.