वार्ताहर /कोगनोळी
गेली दोन वर्षे महाराष्ट्र-कर्नाटक आंतरराज्य सीमेवरील कोगनोळी येथे कर्नाटक पोलिसांकडून कोगनोळी टोलनाका चौक व दूधगंगा नदी पुलावर कोरोना तपासणी नाका सुरू आहे. प्रामुख्याने प्रवासी वाहने थांबवून त्यांच्याकडे आरटीपीसीआर अहवाल आहे का? हे तपासले जाते. मध्यंतरी कोरोना लाट ओसरली तरी हा नाका कायम राहिला आणि आता ओमिक्रॉन हा नवा कोरोनाचा व्हेरिएंट आल्यावर कडक तपासणी राबविण्यात येत आहे. वादविवाद, अरेरावी, महामार्गावर अडथळे अशा विविध कारणांनी हा तपासनाका चर्चेत आला आहे. यातून एकीकडे कर्नाटक पोलिसांच्या आडमुठेपणाबद्दल रोष व्यक्त करताना तर दुसऱया बाजूला वरिष्ठाचा आदेश ते काटेकोरपणे पाळतात याचे कौतुकही होत आहे.
महाराष्ट्रातून कर्नाटकात जाताना दूधगंगा नदीवर कागदपत्रांची तपासणी व कसून चौकशी करूनच वाहनधारकांना प्रवेश दिला जातो. कसून चौकशी केली जात असल्याने वाहनांच्या महामार्गावर रांगा लागत आहेत. पोलीस बंदोबस्तही कडक आहे. महाराष्ट्र सीमाभागात आजरा, गडहिंग्लज, चंदगड तालुक्मयातील प्रवाशांनाही या मार्गावरूनच जावे लागते. याचा त्रास सहन करावा लागत आहे.