वार्ताहर/ राजापूर
कोकणातील सुपारी उत्पादनाला मागील 10 ते 12 वर्षापासून उतरती कळा लागली आहे. दरवर्षी सुपारीवर बुरशीजन्य रोग पडत असून सुपारी तयार होण्यापूर्वीच गळत असल्याने उत्पन्नात मोठय़ा प्रमाणात घट होत आहे. त्यामुळे या बागायतींवरच अवलंबून असणारे शेतकरी हतबल झाले असून कुटूंबाचा डोलारा सांभाळणेही आता कठीण बनले आहे.
आंबा, काजू, नारळाप्रमाणे कोकणात सुपारीच्या बागाही दिसतात. पूर्वीच्या प्रमाणात सुपारींच्या बागांची संख्या तशी नजरेआड होणारी असली तरी आजही कोकणातील सुमारे 3 हजार हेक्टरपेक्षा जास्त सुपारांच्या बागा आहेत. रत्नागिरी जिह्यातील राजापूर, दापोली, गुहागर, जैतापूर, पावस, गणपतीपूळे, मालगुंड अशा भागांमध्ये तर संगमेश्वर आणि लांजा तालुक्यांत काही प्रमाणात सुपारींच्या बागा दिसतात. सिंधुदूर्ग आणि रायगडमधील बरेचसे क्षेत्र या बागायतीखाली आहे.
पूर्वी कोकणात पाटाचे पाणी मुबलक प्रमाणात होते. सुपारीच्या बागा या मुबलक पाण्यावरच अवलंबून असतात. मात्र जसजसे हे मुबलक पाण्याचे स्त्राsत कमी कमी होत गेले, तसतशा सुपारींच्या बागांची संख्याही आटू लागल्याचे चित्र आहे. आजकाल फळबाग लागवडीमध्ये आंबा आणि काजूच्या खालोखाल शेतकऱयांचा कल नारळ लागवडीकडे असला तरीही बऱयाच ठिकाणी केवळ सुपारीवरच अवलंबून असलेल्या बागायतदारांची संख्या काही कमी नाही. काहीजणांच्या या बागायती पूर्वापार आहेत, त्यामुळे शिक्षण घेण्याऐवजी काही तरूणांचा ओढा या बागायती सांभाळण्याकडे होता. परंतू आता या बागायतींमध्ये काही ‘राम’ राहीले नाही, असे म्हणण्याची वेळ आता या बागायतदारांवर आली आहे.
राजापूर तालूक्यातील भू पंचक्रोशी ही सुपारी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. मात्र गेली 10-12 वर्षे या सुपारी बागायतीला उतरती कळा आली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे सुपारीवर आलेला बुरशीजन्य कोळे रोग. सर्वसाधारण जून ते जानेवारी हा काळ सुपारी तयार होण्यासाठी पोषक आहे. पूर्वी याच काळात सुपारी उत्पादन चांगले होत असे. मात्र सन 2007 सालपासून आलेल्या बुरशीजन्य कोळे रोगामुळे होणारी हंगामा अगोदरची फळगळ ही शेतकऱयांच्या चिंतेचा विषय बनत चालली आहे. बहुतेक सर्वच शेतकरी या समस्येने ग्रासले आहेत. काही शेतकऱयांनी तर या समस्येमुळे सुपारी बागायत नष्ट केल्या आहेत. दापोली कृषीविद्यापिठाचे तज्ञ पण या समस्येवर उपाय शोधण्यासाठी प्रयत्नशील आहेत मात्र अद्याप यश आलेल नाही.
यावर्षीही या रोगाचा प्रार्दुभाव झाला असून नुकतीच राजापूर मंडळ कृषी आधिकारी श्रीमती घारगे व कृषी विभागाचे श्री.महाले यांनी सुपारी बागायतींची प्रत्यक्ष पहाणी केली. यावेळी शेतकऱयांनी सुपारी पिकाला विमा संरक्षण मिळावे अशी मागणी अधिकाऱयांकडे केली. कृषीविभागाकडून यासाठी लागणारे सर्व सहकार्य करण्याच आश्वासन यावेळी श्रीमती घारगे यांनी दिले.









