वंदे भारत एक्स्प्रेसची प्रतीक्षा अखेर संपणार
प्रतिनिधी/ खेड
वंदे भारत एक्स्प्रेसची ‘ट्रायल रन’ कोकण रेल्वे मार्गावर मंगळवारी पहाटे 5.30 वाजल्यापासून सुरू झाली आहे. ट्रायल रनसाठी सीएसएमटी येथून निघालेली वंदे भारत एक्स्प्रेस रत्नागिरी स्थानकात सकाळी 10.30 वाजता दाखल झाली. यानंतर निर्धारित वेळेत मडगावच्या दिशेने रवाना झाली. कोकण मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्याच्या दृष्टीने रूट ट्रायल व स्पीड ट्रायल या 2 प्रकारच्या चाचण्या केल्या जाणार आहेत. चाचणी दौड यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
देशभरातील विविध मार्गांवर मेक इन इंडिया अंतर्गत भारतात विकसित करण्यात आलेली आलिशान वंदे भारत एक्स्प्रेस धावू लागली आहे. आतापर्यंत 16 मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस सेवा सुरू झाली आहे. सर्व रेल्वे सेवांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आले आहे. देशातील पहिली तेजस एक्स्प्रेस ज्या कोकण मार्गांवर धावली, त्या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस नेमकी कधी धावणार, याची साऱ्यांनाच उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर ही प्रतीक्षा लवकरच संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत.
कोकण मार्गावरही मुंबई ते मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्याच्या दृष्टीने मंगळवारी ट्रायल घेण्यात आली. कोकण मार्गावर ट्रायलसाठी मंगळवारी पहाटे 5.35 वाजता निघालेली वंदे भारत एक्स्प्रेस कोकण मार्गावर दाखल झाली. चाचणीसाठी सकाळी 10.30 वाजता रत्नागिरी स्थानकात दाखल झालेली वंदे भारत एक्स्प्रेस दुपारी 2.30 वाजता मडगाव स्थानकात पोहचली. यानंतर परतीचा प्रवास सुरू होवून रात्री 11 वाजता सीएसएमटी मुंबई येथे पोहोचल्याचे समजते.
वंदे भारत एक्स्प्रेसच्या कोकण मार्गावरील चाचणीदरम्यान रूट व स्पीड ट्रायल या दोन प्रकारच्या चाचण्या होण्याची शक्यता आहे. या चाचण्यांसाठी आणखी एक चाचणी फेरी होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. मुंबईपासून वीरपर्यंत वंदे भारत एक्स्प्रेससाठी दुहेरी मार्ग असल्याने वीरपर्यंत दोन्ही मार्गावर रोड ट्रायल होण्याची शक्यता आहे. कोकण रेल्वे मार्गावरील चाचण्या पूर्ण झाल्यानंतरच लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते वंदे भारत एक्स्प्रेस सेवेचेही लोकार्पण करण्यात येणार असल्याचे समजते. वंदे भारत एक्स्प्रेस देशातील सध्याची अत्यंत प्रतिष्ठेची रेल्वेगाडी असल्यामुळे ट्रायल रनदरम्यान कोकण मार्गावरील रेल्वेच्या मेपॅनिकल, इलेक्ट्रिकल, ऑपरेटिंग, एस. अँन्ड. टी. सुपरवायझर्स या सर्वांना ‘अलर्ट’ राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
आतापर्यंत ज्या मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाली आहे, तेथे आधीची कोणतीही रेल्वेगाडी बंद न करता सुरू झाली आहे. कोकण रेल्वे मार्गावरही नव्याने सुरू होणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसमुळे तेजस एक्स्प्रेससह अन्य कोणतीही गाडी बंद केली जाणार नसल्याचेही समजते. मुंबई-मडगाव मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यास ती महाराष्ट्रात सुरू होणारी पाचवी तर कोकण मार्गावर सुरू होणारी पहिली सेवा ठरणार आहे. वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यास मुंबई ते गोवा मार्गावरील प्रवाशांची विशेषत: पर्यटकांची चांगली सोय होणार आहे. केवळ 4 ते 5 तासांतच गोव्याहून मुंबई गाठणे शक्य होणार आहे. याचा मोठा फायदा व्यापारीवर्गाला होवून पर्यटन वाढीसाठीही या रेल्वे सेवेची मोठी मदत होणार आहे.









