वार्ताहर/कराड
ओमायक्रॉनच्या रूपाने कोरोनाचा पुन्हा उद्रेक होऊ नये, यासाठी कराडला प्रशासनाने कडक उपाययोजना राबवण्यास सुरूवात केली आहे. सोमवारी लशीचे दोन डोस घेतलेले प्रमाणपत्र दाखवणारांनाच प्रशासकीय इमारतीत प्रवेश दिल्याने प्रमाणपत्र नसणारांची गोची झाली. तालुक्यातील सर्व प्रशासकीय कार्यालये, हॉटेल, मॉल, दुकाने, जिम व थिएटर आदी सार्वजनिक ठिकाणी प्रमाणपत्राची पडताळणी करून केवळ लसवंतानाच प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्याचे प्रांत उत्तम दिघे यांनी सांगितले.
राज्यात व देशात ओमायक्रॉनच्या रूपाने पुन्हा कोरानाचे संकट गडद होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे प्रशासनाने आत्तापासूनच उपाययोजना राबवण्यास सुरूवात केली आहे. नुकत्याच झालेल्या प्रशासकीय बैठकीत कोराना उपाययोजनांबाबत ठोस निर्णय घेण्यात आले. त्यानुसार सर्व प्रशासकीय कार्यालयासह दुकाने, मॉल, थिएटर, जिम व हॉटेलसह सर्वच सार्वजनिक ठिकाणी केवळ दोन डोस घेतलेल्या लसवंतानाच प्रवेश देण्यात येणार आहे.
सोमवारी आठवडय़ाचा पहिला दिवस असल्याने नवीन प्रशासकीय इमारतीत विविध कार्यालयात आलेल्या नागरिकांची संख्या मोठी होती. मात्र इमारतीच्या मुख्य प्रवेशव्दारातून दोन डोस घेतलेले प्रमाणपत्र दाखवणारांनाच आत सोडण्यात येत होते. त्यामुळे ज्यांच्याकडे प्रमाणपत्र नाही अशा नागरिकांना प्रशासकीय इमारतीच्या बाहेरच थांबावे लागले. काम न करता रिकाम्या हाताने घरी परतावे लागले. ज्यांच्याकडे प्रमाणपत्र नाही, अशा लोकांसाठी याठिकाणी एक नंबर लिहला आहे. या नंबरवरून आपले प्रमाणपत्र प्राप्त करता येते. ते प्रमाणपत्र दाखवून नागरिकांना प्रशासकीय ईमारतीत प्रवेश देण्यात येत आहे.
सोमवारी पहिलाच दिवस असल्याने काही काळ गोंधळ उडाला होता. काही नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. मात्र त्यांच्याकडे मोबाईल नसल्याने प्रमाणपत्र डाऊनलोड करता आले नाही. परिणामी अशा लोकांना प्रवेश मिळाला नाही. याबाबत प्रांत उत्तम दिघे यांनी सांगितले की, एक डोस घेतल्यानंतर अनेकजण दुसरा डोस घेण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत.
कराड नगरपालिकेतही प्रमाणपत्र पाहून प्रवेश
सोमवारपासून येथील नगरपालिकेतही दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र पाहूनच आत प्रवेश देण्यात येत होता. त्यामुळे पालिकेत रोज दिसणारी वर्दळ दिसत नव्हती. पालिकेची तिन्ही प्रवेशद्वारे बंद करण्यात आली आहे. एका प्रवेशद्वारातून प्रमाणपत्र पाहूनच आत प्रवेश देण्यात येत आहे. मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.









