प्रतिनिधी/ दापोली
तालुका काँग्रेसचे अध्यक्ष, बांधकाम व्यावसायिक व माजी उपनगराध्यक्ष अनंत उर्फ भाऊ मोहिते यांच्या मुलाचा विवाह लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर केवळ 3 लोकांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने सोशल डिस्टन्स पाळून नुकताच जालगाव येथे झाला.
भाऊ मोहिते यांच्या जालगाव येथील निवासस्थानी असणाऱया गॅलरीत हा विवाह सोहळा झाला. भाऊ मोहिते यांचा मुलगा अनिरुद्ध व तालुक्यातील गिम्हवणे येथील सुनील महाडिक यांची कन्या सेजल हे केवळ 3 लोकांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्स राखून विवाहबंधनात अडकले. हा विवाह सोहळा सायंकाळी 4 वाजता पार पडला. विवाहग्न लागलेल्या गॅलरीत वधू-वरांखेरीज केवळ वर-वधूची आई व बौद्ध उपासक एवढय़ा केवळ 3 व्यक्ती उपस्थित होत्या. विवाहाच्या आधी त्याचठिकाणी साक्षगंध विधीदेखील पार पडला. या सर्व विधींच्या वेळी वधू-वर, विवाह लावणारे बौद्ध उपासक, वधू व वराची आई या सर्वांनी चेहऱयावर कोरोनारोधक मास्क लावला होता.
या विवाह सोहळ्यात बेंडबाजा, फटाके, लाऊड स्पिकर आदी गोष्टींना फाटा देण्यात आला होता. कोणत्याही पाहुणे मंडळींना बोलावण्यात आले नव्हते. केवळ मोहिते व महाडिक या दोन कुटुंबामधील व्यक्ती इमारतीच्या आपापल्या फ्लॅटमधील गॅलरीत सोशल डिस्टन्सिंग राखून उभ्या होत्या. बौद्ध उपासक दिलीप जाधव यांनी हा विवाह सोहळा पार पडल्यावर गॅलरीमध्ये उभ्या असणाऱया कुटुंबातील व्यक्तीनी लांबूनच वधू-वरांवर पुष्पवृष्टी केली. अत्यंत साधेपणाने पार पडलेल्या या विवाह सोहळय़ानिमित्त दोन्ही कुटुंबांनी दाखवलेल्या सामाजिक जाणीवेबद्दल त्यांचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
वाचलेले पैसे सामाजिक कामासाठी वापरणार : मोहिते
या सोहळ्याबद्दल बोलताना भाऊ मोहिते यांनी हा उपक्रम महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी राबवणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. तसेच अत्यंत साधेपणाने व कमी व्यक्तीच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला असल्याने व इतर सर्व खर्चिक गोष्टींना फाटा देण्यात आला आहे. यामुळे उरलेले पैसे आपण देवधर्म व सामाजिक कामाला देणार असल्याचे स्पष्ट केले.









