केरी /वार्ताहर
बेळगाव आणि पिरणवाडी भागात कोरोना जीवाणूच्या संक्रमणाची प्रकरणे वाढल्याने त्याचा धसका केरी सत्तरीतील लोकांनी घेतला असून बेळगावातून होणारा भाजीपाला पुरवठा बंद करण्याची मागणी वाढत आहे. याचाच भाग म्हणून आज केरी सत्तरी ग्रामपंचायतीने केरीतून होणारी भाजीपाला वाहतूक बंद करण्याची मागणी केली. केरी पंचायत हॉल मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ही मागणी केली. यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच गोविंद गावस, पंच सदस्य लक्ष्मण पांडुरंग गावस, सत्यवान गावस व वासुदेव सावंत हे उपस्थित होते.
यावेळी सरपंच श्री गावस यांनी सांगितले की केरी सत्तरी व गोव्यातील इतर भागात होणारा भाजी पुरवठा हा बेळगावतून होतो. आणि याची वाहतूक चोर्ला घाटमार्गे केरीतून होते. लॉक डाउनच्या पूर्वी येथून होणारी अशा भाजीपाला वाहनांची संख्या कमी होती पण आता ती मोठय़ा संख्येने वाढली आहे. बरेच खाजगी व्यावसायिक आपल्या स्वतःची वाहने घेऊन बेळगावात जाऊन भाजीपाला घेऊन येतात. सरकारच्या मान्यतेने ही आणतात खरी पण बेळगाव परिसरात कोरोना संक्रमिताची संख्या वाढत असल्याने त्याचा धोका गोव्याला निर्माण होणार आहे. या भागातून जाणारी वाहनांमध्ये वाहन चालक व त्याचा एक-दोन सोबती बेळगावात जाऊन भाजीपाला आणतात. तेंव्हा अशा लोकांच्या संपर्कातून कोरोना गोव्यात पोहचण्याची भीती ही श्री गावस यांनी व्यक्त केली.
यावेळी पंच सदस्य लक्ष्मण गावस यांनी सांगितले की बेळगावात भाजी पाल्याच्या मंडी किती सुरक्षित आहे, तिथे कोरोना प्रतिबंध सुरक्षतेची काळजी घेतली जाते का? असे प्रश्न अनुत्तरीत राहतात तेव्हा बेळगाव हे गोव्यासाठी धोकादायक ठरू शकते तेव्हा तूर्त हा भाजीपाला बंद करावा अशी मागणी त्यांनी केली.
केरी सुरक्षित राहिला तर गोवा सुरक्षित
सद्य चोर्ला घाटातून भाजीपाला ची वाहतूक केरी साठी धोकादायक ठरू शकते. चोर्लातुन होणारी वाहतूक केरी तपासणी केली जाते. त्यामुळे त्यांचा केरीत थांबा होतो. अशातून केरी वासीयांना याचा जास्त धोका आहे. जर याची लागण केरीत झाली तर त्याचा प्रसार गोव्यातील इतर भागात होणे शक्मय आहे तेव्हा बेळगावातून केरीत यांची लागण रोखण्याचे आवाहन आहे तेंव्हा सरकारने याची योग्य काळजी घ्यावी असे पंच सत्यवान गावस यांनी सांगितले.
सरकारने हे विचार गांभियाने घ्यावे
दरम्यान यावेळी सरपंच गोविंद गावस यांनी सांगितले की बेळगाव व पिरणवाडीचा आम्हाला खूपच धोका आहे. हा धोका लक्षात घेता मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत व आरोग्य मंत्री यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. केरी गावची जनता यासाठी भयभीत झाली आहे. तेव्हा सरकारने याकडे त्वरित कारवाई करावी. आम्ही काही दिवस भाजीपाला शिवाय जगू शकतो पण असा रोग आम्हाला नको. सरकारने लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये असे सांगितले.
तसेच सरकारने कर्नाटक हद्द बंद केली व महाराष्ट्र हद्द पूर्णपणे बंद न केल्यामुळे विर्डी, तळेखोल मार्गे महाराष्ट्रातील लोक गोव्यात प्रवेश करतात व बिनदास्त सर्वत्र फिरतात तेव्हा त्यांच्यावर थोडय़ा प्रमाणात आळा घालावा असे लक्ष्मण गावस याने मत मांडले.









