निवडणूक प्रचाराच्या अखेरीस व्हायचे आयोजन
केरळमध्ये निवडणूक प्रचाराच्या समारोपादाखल पारंपरिक स्वरुपात पक्षांकडून काढण्यात येणाऱया रॅलीचे आयोजन यंदा होणार नाही. या रॅलींवर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे.
राज्य निवडणूक अधिकारी टीकाराम मीणा यांच्या सुचनेनुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रचाराच्या अखेरीस पारंपरिक स्वरुपात काढण्यात येणाऱया मोठय़ा रॅलींवर बंदी घातली आहे. राज्यात 6 एप्रिल रोजी होणाऱया मतदानापूर्वी राजकीय पक्ष ही मोठी रॅली काढणार होते.
केरळमध्ये याला ‘कोट्टिकलशम’ म्हटले जाते आणि यावेळी सर्व राजकीय पक्ष शक्तिप्रदर्शन करत असतात. या रॅलींमध्ये अधिकाधिक समर्थकांना सामील करण्याचा प्रयत्न केला जात असतो. केंद्रीय निवडणूक आयोगाने बंदीचा हा निर्णय कोरोना संक्रमण फैलावाला रोखण्याच्या उद्देशाने घेतल्याचे समजते. याचदरम्यान तिरुअनंतपुरमच्या जिल्हाधिकारी नवज्योत खोसा यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी कठोर निर्बंध लागू करत राजधानीतील सतर्कता वाढविली आहे.









