केरळच्या एर्नाकुलममध्ये वॉक इन सॅम्पल कलेक्शन कियोस्क म्हणजेच बूथची सुरुवात करण्यात आली आहे. या माध्यमातून कोविड-19 च्या संशयिताचे नमुने गोळा करता येणार आहेत. गळय़ातील स्त्रावाचा नमुना घेताना कियॉस्कमध्ये आरोग्य कर्मचारी उपलब्ध राहणार आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, एर्नाकुलम आणि वैद्यकीय अधिकारी तसेच डॉक्टरांच्या नेतृत्वाखालील पथकाच्या सल्लानुसार कियॉस्कचे स्वदेशी प्रारुप तयार करण्यात आले आहे. दक्षिण कोरियात वापरण्यात आलेल्या कियॉस्कवर आधारित याची निर्मिती करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी एस. सुहास यांनी दिली आहे.
नमुने गोळा करण्यास मदत
पीपीईचा वापर कमी करण्यास हे कियॉस्क मदत करू शकतील. वन-टाईम यूज किटमुळे निर्माण होणारा कचराही कमी होण्यास हातभार लागणार आहे. हे कियॉस्क समूह संसर्ग ओळखण्यास उपयुक्त ठरू शकणार आहेत. कियॉस्कमध्ये स्वॅबचा नमुना घेण्यास केवळ 1 किंवा 2 मिनिटांचा कालावधी लागतो. जिल्हाधिकारी सुहास यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कोरोना नियंत्रण कक्ष, चाचणी केंद्रांमध्ये कियॉस्क निर्माण करण्याची योजना आखत आहे.









