कोची :
केरळच्या कोची शहरात मरादू या समुद्रकिनारी भागात उभारण्यात आलेल्या दोन अवैध इमारतांच्या एच2ओ होली फेथ अपार्टमेंट परिसराला जमीनदोस्त करण्याची प्रक्रिया शनिवारी सकाळी पूर्ण झाली आहे. जिल्हा प्रशासनाने दोन्ही इमारती स्फोटकांच्या मदतीने पाडविल्या आहेत. या कारवाईमुळे पूर्ण परिसरात धूळ पसरली असून मोठा ढिगारा निर्माण झाला आहे. एक इमारत जमीनदोस्त करण्यासाठी सुमारे 8 सेकंदाचा कालावधी लागला आहे.
दोन्ही इमारतींमध्ये एकूण 343 आलिशान सदनिका निर्माण करण्यात आल्या होत्या. तसेच या इमारतींमध्ये सप्ततारांकित सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या. इमारती पाडविण्यात आल्याने एकूण 70 हजार टनाचा ढिगारा निर्माण झाला असून तो हटविण्यासाठी 20 ट्रक्सना 60 दिवसांचा कालावधी लागणार आहे. शनिवारी सकाळी या इमारती पूर्णपणे रिकामी करविण्यात आल्या होत्या.
इमारती जमीनदोस्त करण्यासाठी 800 किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला आहे. एर्नाकुलम जिल्हाधिकाऱयांनी क्षेत्रातील दोन नागरी परिसरांमध्ये जमावबंदी लागू केली होती. परिसरातील रस्त्यांवरील वाहतूकही रोखण्यात आली होती. किनारी नियमन क्षेत्राच्या (सीआरझेड) मापदंडांचे उल्लंघन करत उभारण्यात आलेल्या दोन्ही इमारती सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पाडविण्यात आल्या आहेत. अन्य इमारती रविवारी पाडविल्या जाणार आहेत. एकूण 343 सदनिका असलेल्या इमारती जमीनदोस्त करण्यात येणार आहेत. अपार्टमेंट्समध्ये स्फोटके पेरण्याचे काम बुधवारीच पूर्ण करण्यात आले होते. परिसरातील अन्य इमारतींना धक्का न पोहोचू देता हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.









