वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
केरळचे उच्च शिक्षणमंत्री के. टी. जलील यांनी पी. विजयन यांच्या मंत्रिमंडळाच्या सदस्यत्वाचा मंगळवारी राजीनामा दिला आहे. जलील यांनी स्वतःच्या एका नातेवाईकाला लाभ पोहोचविण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून स्वतःच्या पदाचा गैरवापर केल्याचे राज्य लोकायुक्तांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले होते. जलील यांनी मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या राजीनाम्याचे पत्र पाठविले आहे. तसेच फेसबुकवर यासंबंधी पुष्टी दिली आहे.
लोकायुक्तांच्या एका खंडपीठाने जलील यांच्या विरोधातील स्वतःचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सोपविला होता. जलील यांनी मंत्रिपदावर राहू नये असेही म्हटले होते. मंत्र्याच्या विरोधात सत्तेचा गैरवापर, लाभ पोहोचविण्याचा आरोप सिद्ध होत असल्याचे खंडपीठाने म्हटले होते.
मुस्लीम युथ लीगच्या नेत्याकडून 2018 मध्ये करण्यात आलेल्या तक्रारीवर लोकायुक्तांचा हा निर्णय आला आहे. जलील यांचे नातलग असलेल्या अदीब यांना केरळ राज्य अल्पसंख्याक विकास वित्त महामंडळाच्या महाव्यवस्थापकपदी नियुक्त करताना नियमांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची तक्रार होती. नियुक्तीवेळी अदीब हे एका खासगी बँकेचे व्यवस्थापक होते.









