आदिवासी व्यक्तीच्या ‘आत्महत्ये’ची व्हावी चौकशी
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी कोझिकोड वैद्यकीय महाविद्यालयानजीक आदिवासी युवक विश्वनाथच्या कथित आमहत्येप्रकरणी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी विश्वनाथ यांच्या आत्महत्येप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. राहुल गांधी यांचा मतदारसंघ असलेल्या वायनाड येथील आदिवासी युवकाचा मृतदेह कोझिकोड वैद्यकीय महाविद्यालयानजीक आढळून आला होता.
विश्वनाथवर चोरीचा खोटा आरोप करून जमावाने 9 फेब्रुवारी रोजी मारहाण केली होती. त्याचदिवशी विश्वनाथ बेपत्ता झाला होता आणि 10 फेब्रुवारी रोजी त्याचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आल्याचे त्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. चोरीचा आरोप झाल्याने विश्वनाथने आत्महत्या केल्याचा पोलिसांचा दावा आहे.
विश्वनाथच्या कुटुंबीयांना भेटलो असून त्यांनी याप्रकरणी विस्तृत चौकशीची मागणी केली आहे. तसेच पुन्हा शवविच्छेदन करण्याची विनंती त्यांनी केली आहे. विश्वनाथ यांच्या कुटुंबीयांना ही हत्या असल्याचा संशय आहे. केरळच्या एससी/एसटी आयोगानेही पोलिसांचा अहवाल फेटाळला असल्याचे राहुल यांनी पत्रात नमूद केले आहे.
विश्वनाथच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी सुरू करावी. विश्वनाथचे कुटुंब विशेषकरून त्याच्या मुलांना न्याय मिळायला हवा. त्याच्या कुटुंबाला सहाय्य निधी आणि मानवी आधारावर कुटुंबातील एका सदस्याला नोकरी द्यावी असे राहुल यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.









