उड्डाणपूल निर्मितीत भ्रष्टाचाराचा आरोप : दक्षता विभागाची कारवाई
वृत्तसंस्था / कोची
केरळचे माजी मंत्री आणि आययुएमएलचे आमदार व्हीके इब्राहिम कुंजू यांना दक्षता तसेच भ्रष्टाचारविरोधी शाखेने बुधवारी अटक केली आहे. राज्यातील यापूर्वीच्या काँग्रेस-युडीएफ शासनकाळात उड्डाणपूल निर्मितीत झालेल्या कथित भ्रष्टाचाराप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
याप्रकरणी तपास करणाऱया दक्षता अधिकाऱयांनी कुंजू यांना खासगी रुग्णालयातून अटक केली आहे. दक्षता पथकाने अटकेपूर्वी रुग्णाल प्रशासनाशी चर्चा केली होती.
कुंजू यांनी स्वतःवरील सर्व आरोप फेटाळत कारवाईला राजकीयदृष्टय़ा प्रेरित ठरविले आहे. उड्डाणपूलाच्या निकृष्ट गुणवत्तेसाठी कुंजू जबाबदार असल्याचा आरोप आहे. ओमन चंडी यांच्या नेतृत्वाखालील युडीएफ सरकारमध्ये पुंजू हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना या उड्डाणपूलाची निर्मिती करण्यात आली होती. तर सध्याच्या राज्य सरकारने या उड्डाणपूलाची पुनर्निर्मिती करविण्याचा निर्णय घेतला आहे.
42 कोटी रुपये खर्चुन तयार करण्यात आलेला हा उड्डाणपूल 100 वर्षांहून अधिक वर्षांपर्यंत टिकणे अपेक्षित होते. ऑक्टोबर 2016 मध्ये हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. केवळ 3 वर्षांमध्ये तो ढासळू लागल्याने बंद करावा लागला होता. उड्डाणपूलाची निर्मिती आरडीएस प्रोजेक्ट्सकडून रस्ते आणि पूल विकास निगमसाठी करण्यात आली होती.
याप्रकरणी यापूर्वीच 4 जणांना अटक झाली असून ते जामिनावर बाहेर आहेत. आरडीएस प्रोजेक्ट्सचे प्रकल्प संचालक सुमित गोयल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी सचिव टी.ओ. सोरज, पर्यवेक्षण संस्थेचे प्रतिनिधी बेनी पॉल तसेच निगमचे पदाधिकारी एम.टी. थकाचन यांना अटक करण्यात आली होती.









