प्रतिनिधी / कोल्हापूर
लोकांचे मनोरंजन करणाऱया जिल्हयातील केबल ऑपरेटर व्यावसायिकांच्या विविध मागण्यासाठी शुक्रवारी गांधी जयंतीदिनी शिवाजी पेठेतील गांधी मैदानावरील गांधी पुतळयाखाली मूक निदर्शने करण्यात आली. या निदर्शनामध्ये जिल्हयातील सुमारे 150 केबल ऑपरेटर सहभागी झाले होते. ऑल इंडिया केबल फेडरेशनने 2 ऑक्टोबर रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. या संपाला पाठींबा म्हणून कोल्हापूर केबल ऑपरेट सेवाभावी संघटनेचे जिल्हयातील सर्व केबल ऑपरेटर सहभागी झाले होते.
संघटनेचे संस्थापक महेश बराले म्हणाले, आम्ही गेली 25 ते 30 वर्षे केबल ऑपरेटर म्हणून काम करत आहोत. घरबसल्या लोकांचे मनोरंजन करून घरोघरो सेवा देण्याचे काम करत आहोत. पण आम्हाला कोणतीच सुविधा वा सोय नाही. केबल ऑपरेटरांना वायर ओढणे, कनेक्शन देणे हे काम करावे लागत आहे. यापूर्वी करमणूक अधिकाऱयांच्या नियमानुसार केबल ऑपरेटरांना काम करावे लागत होते. परंतु सद्यस्थितीत ट्रायची नियमावली अस्तित्वात आली आहे. पण यामध्ये आमचा समावेश नसल्याने, आमच्यासाटी ट्रायचा कायदा लागू करावा अशी मुख्य मागणी असल्याचे महेश बराले यांनी सांगितले. केबलच्या अडचणी व तक्रारीचे निवारण करण्यासाटी आम्हाला दिल्लीला जावे लागते.
या आमच्या तक्रारी मांडण्यासाठी कोल्हापूर जिल्हयामध्ये ट्राय अधिकाऱयाची नेमणूक करावी. नवीन कायद्यात केबल ऑपरेटर साठी कायदा झाला पाहीजे. जुने रेग्युलेशन रद्द करून,फ्री डिशवरील पे चॅनेल बदं करावे अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र साबळे, उपाध्यक्ष अजय राऊत, काका पाटील,दिव्या सुनिल कदम यांनी आपल्या भाषणात केली. यावेळी माजी नगरसेवक विनायक फाळके, प्रकाश पाटील, अशोक पाखरे, तनुज गायकवाड,अस्लम किल्लेदार,राजू बेले,मुसाभाई कुलकर्णी, निशांत राऊत व केबल ऑपरेटर उपस्थित होते. यावेळी केबल ऑपलेटर कामगार व कर्मचारी संघटनेने याला पाठींबा दिला होता.









