सलग 4 पराभवांची मालिका अखेर खंडित, , पंजाब किंग्सला 5 गडी राखून नमवले
अहमदाबाद / वृत्तसंस्था
कर्णधार इयॉन मॉर्गनने 40 चेंडूत नाबाद 47 धावांची संयमी खेळी साकारल्यानंतर केकेआरने पंजाब किंग्सविरुद्ध आयपीएल साखळी सामन्यात 5 गडी राखून विजय संपादन केला आणि आपल्या सलग 4 पराभवाची मालिका देखील खंडित केली. गोलंदाजांनी नियंत्रित मारा करत पंजाबला 9 बाद 123 धावांवर रोखल्यानंतर केकेआरने फलंदाजीतही प्रभावी खेळ साकारत 16.4 षटकात 5 गडय़ांच्या बदल्यात विजयावर शिक्कामोर्तब केले.
या निकालासह केकेआरने सलग 4 पराभवांची मालिका खंडित केली असून गुणतालिकेत ते 6 सामन्यात 4 गुणांसह पाचव्या स्थानी पोहोचले आहेत. पंजाब किंग्सचा संघ किंचीत खाली घसरुन सहाव्या स्थानी आला आहे.
नरेंद्र मोदी स्टेडियमवरील या लढतीत विजयासाठी 124 धावांचे किरकोळ आव्हान असताना केकेआरची एकवेळ 3 बाद 17 अशी दाणादाण उडाली होती. पण, मॉर्गनने संयमी खेळ साकारत राहुल त्रिपाठीसह 48 चेंडूत 66 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी साकारली आणि येथेच त्यांच्या विजयाचा भक्कम पाया रचला गेला. राहुल त्रिपाठीने 32 चेंडूत 7 चौकारांसह जलद 41 धावांचे योगदान दिले. आंद्रे रसेल 15 धावांवर जरुर बाद झाला. पण, नंतर कर्णधार मॉर्गनने दिनेश कार्तिकसह (नाबाद 12) विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. मॉर्गनच्या खेळीत 4 चौकार व 2 उत्तुंग षटकारांचा समावेश राहिला. केकेआरने 20 चेंडूंचा खेळ बाकी राखत पूर्ण 2 गुणांची कमाई केली.
केकेआरचा भेदक मारा
तत्पूर्वी, केकेआरच्या गोलंदाजांनी अतिशय नियंत्रित, भेदक मारा साकारत पंजाबला 20 षटकात केवळ 9 बाद 123 धावांवरच रोखण्यात यश प्राप्त केले. पंजाबतर्फे सलामीवीर मयांक अगरवालने 31 चेंडूत 34 धावा जमवल्या आणि हीच त्यांच्याकडून सर्वोच्च खेळी ठरली. याशिवाय, ख्रिस जॉर्डनने जवळपास प्रत्येक चेंडूवर तुटून पडत 18 चेंडूत जलद 30 धावा फटकावल्या. प्रसिद्ध कृष्णाने 30 धावात 3 फलंदाजांना बाद केले तर पॅट कमिन्स व सुनील नरेन यांनीही प्रत्येकी 2 बळी घेत पंजाबला रोखण्यात मोलाचा वाटा उचलला. या लढतीत केकेआरने नाणेफेक जिंकल्यानंतर पंजाबला प्रथम फलंदाजीला पाचारण केले होते.
प्रारंभी, केएल राहुल (19) व मयांक (31) यांनी 5.4 षटकात 36 धावांची सलामी दिली. कमिन्सने राहुलला उत्तुंग फटका मारण्याच्या चक्रव्युहात अडकवत नरेनकरवी झेलबाद केले. ख्रिस गेलचे पहिल्या चेंडूवर बाद होणे पंजाबसाठी आणखी धक्कादायक ठरले. मावीच्या बाहेर जाणाऱया चेंडूला छेडण्याच्या प्रयत्नात गेलने यष्टीमागे कार्तिककडे सोपा झेल दिला. अष्टपैलू दीपक हुडाला प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर बॅकवर्ड पॉईंटवरील मॉर्गनच्या अप्रतिम झेलामुळे तंबूत परतावे लागले. मयांकनेही नरेनच्या गोलंदाजीवर डीप मिडविकेटवरील त्रिपाठीकडे झेल दिला.
अष्टपैलू हेन्रिक्यूजचा नरेनने त्रिफळा उडवला तर निकोलस पूरन देखील वरुणच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत होत तंबूत परतला. शाहरुख खान (13), रवी बिश्नोई (1) देखील स्वस्तात बाद झाले आणि पंजाबच्या पडझडीची मालिका सुरुच राहिली. गोलंदाजीच्या आघाडीवर प्रसिद्ध कृष्णाने 30 धावात 3 तर सुनील नरेन (2-22), पॅट कमिन्स (2-31) यांनी प्रत्येकी 2 फलंदाजांना बाद केले.
धावफलक
पंजाब किंग्स ः केएल राहुल झे. नरेन, गो. कमिन्स 19 (20 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), मयांक अगरवाल झे. त्रिपाठी, गो. नरेन 31 (34 चेंडूत 1 चौकार, 2 षटकार), ख्रिस गेल झे. कार्तिक, गो. शिवम मावी 0 (1 चेंडू), दीपक हुडा झे. मॉर्गन, गो. प्रसिद्ध कृष्णा 1 (4 चेंडू), निकोलस पूरन त्रि. गो. वरुण 19 (19 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), मोईसेस हेन्रिक्यूज त्रि. गो. नरेन 2 (3 चेंडू), शाहरुख खान झे. मॉर्गन, गो. प्रसिद्ध कृष्णा 13 (14 चेंडूत 1 षटकार), ख्रिस जॉर्डन त्रि. गो. प्रसिद्ध कृष्णा 30 (18 चेंडूत 1 चौकार, 3 षटकार), रवी बिश्नोई झे. मॉर्गन, गो. कमिन्स 1 (4 चेंडू), मोहम्मद शमी नाबाद 1 (2 चेंडू), अर्शदीप सिंग नाबाद 1 (1 चेंडू). अवांतर 5. एकूण 20 षटकात 9 बाद 123.
गडी बाद होण्याचा क्रम
1-36 (केएल राहुल, 5.4), 2-38 (ख्रिस गेल, 6.3), 3-42 (दीपक हुडा, 7.4), 4-60 (मयांक, 11.2), 5-75 (हेन्रिक्यूज, 13.1), 6-79 (पूरन, 14.2), 7-95 (शाहरुख, 17.2), 8-98 (रवी बिश्नोई, 18.1), 9-121 (जॉर्डन, 19.4).
गोलंदाजी
शिवम मावी 4-0-13-1, पॅट कमिन्स 3-0-31-2, सुनील नरेन 4-0-22-2, प्रसिद्ध कृष्णा 4-0-30-3, आंदे रसेल 1-0-2-0, वरुण चक्रवर्ती 4-0-24-1.
केकेआर ः शुभमन गिल पायचीत गो. शमी 9 (8 चेंडूत 2 चौकार), नितीश राणा झे. शाहरुख, गो. हेन्रिक्यूज 0 (1 चेंडू), राहुल त्रिपाठी झे. शाहरुख, गो. हुडा 41 (32 चेंडूत 7 चौकार), सुनील नरेन झे. बिश्नोई, गो. अर्शदीप 0 (4 चेंडू), इयॉन मॉर्गन नाबाद 47 (40 चेंडूत 4 चौकार, 2 षटकार), आंद्रे रसेल धावचीत (अर्शदीप-राहुल) 10 (9 चेंडूत 2 चौकार), दिनेश कार्तिक नाबाद 12 (6 चेंडूत 2 चौकार). अवांतर 7. एकूण 16.4 षटकात 5 बाद 126.
गडी बाद होण्याचा क्रम
1-5 (नितीश राणा, 0.4), 2-9 (शुभमन, 1.5), 3-17 (सुनील नरेन, 2.6), 4-83 (राहुल त्रिपाठी, 10.6), 5-98 (रसेल, 14.1).
गोलंदाजी
मोईसेस हेन्रिक्यूज 1-0-5-1, मोहम्मद शमी 4-0-25-1, अर्शदीप सिंग 2.4-0-27-1, रवी बिश्नोई 4-0-19-0, ख्रिस जॉर्डन 3-0-24-0, दीपक हुडा 2-0-20-1.









