कर्णधार इयॉन मॉर्गनचे धडाकेबाज अर्धशतक, जलद गोलंदाज पॅट कमिन्सचे 34 धावात 4 बळी
वृत्तसंस्था/ दुबई
कर्णधार इयॉन मॉर्गनचे (35 चेंडूत नाबाद 68) धडाकेबाज अर्धशतक व पॅट कमिन्सचा (34 धावात 4 बळी) भेदक मारा, यामुळे केकेआरने राजस्थान रॉयल्सचा 60 धावांनी सहज धुव्वा उडवला आणि गुणतालिकेत 8 व्या स्थानावरुन थेट चौथ्या स्थानी झेप घेतली. केकेआरने 7 बाद 191 धावांचा डोंगर रचल्यानंतर राजस्थानला 20 षटकात 9 बाद 131 धावांवर समाधान मानावे लागले.
192 धावांचे कठीण आव्हान असताना राजस्थानचे पहिले 4 फलंदाज अवघ्या 32 धावांमध्येच बाद झाले आणि या धक्यातून ते शेवटपर्यंत सावरु शकले नाहीत. या पूर्ण लढतीत केवळ केकेआरचे एककलमी वर्चस्व राहिले. उत्थप्पा (6), स्टोक्स (18), स्टीव्ह स्मिथ (4), संजू सॅमसन (1) यांच्यासारखे फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर राजस्थानचा पराभव ही निव्वळ औपचारिकता होती.
उत्थप्पा कमिन्सच्या पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर नागरकोटीकरवी झेलबाद झाला आणि इथून कमिन्सचा धडाका सुरु राहिला. त्याने बेन स्टोक्सला कार्तिककरवी झेलबाद केले तर स्टीव्ह स्मिथला त्रिफळाचीत केले. स्मिथने बाहेर जाणारा चेंडू यष्टीवर ओढवून घेतला. बटलरने 22 चेंडूत 35 धावा केल्या. पण, त्याला बाद करताना कमिन्सच कामी आला. वरुणच्या गोलंदाजीवर कमिन्सने त्याचा झेल टिपला. रियान पराग कमिन्सचा बळी ठरला.
राहुल तेवातियाने 27 चेंडूत जलद 31 धावा फटकावल्या. पण, त्याला वरुणने कार्तिककरवी झेलबाद केले. दिनेश कार्तिकने या लढतीत यष्टीरक्षणात उत्तम चुणूक दाखवताना काही अवघड झेलही लीलया टिपले.
कर्णधार इयॉन मॉर्गनने अवघ्या 35 चेंडूत 68 धावांची आतषबाजी केल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सविरुद्ध आयपीएल साखळी सामन्यात 20 षटकात 7 बाद 191 धावांचा डोंगर रचला. वास्तविक, आघाडी फळीतील फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत राहिल्याने केकेआरचा निम्मा संघ 12.3 षटकात अवघ्या 99 धावात तंबूत परतला होता. पण, उर्वरित 7.3 षटकात केकेआरच्या फलंदाजांनी कमाल करत तब्बल 92 धावांची भर घातली. त्यामुळे, या संघाला 200 धावांच्या उंबरठय़ापर्यंत पोहोचता आले. राजस्थानने केकेआरला प्रथम फलंदाजीला पाचारण केले. प्रारंभी, केकेआरची सुरुवात खराब झाली. नितीश राणा जलद गोलंदाज आर्चरच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. पण, त्यानंतर शुभमन गिल (24 चेंडूत 36) व राहुल त्रिपाठी (39) यांनी दुसऱया गडय़ासाठी 8.1 षटकात 72 धावांची भागीदारी साकारली होती. शुभमन दुसऱया गडय़ाच्या रुपाने बाद झाल्यानंतर सुनील नरेन देखील खाते उघडण्यापूर्वीच आल्या पावली परतला. राहुल त्रिपाठीने गोपालच्या गोलंदाजीवर उत्थप्पाकडे झेल दिला तर दिनेश कार्तिकही गोल्डन डकचा मानकरी ठरला.
आंद्रे रसेलने 11 चेंडूत 25 धावांची आतषबाजी केली तर कमिन्सने 11 चेंडूत जलद 15 धावा फटकावल्या. अर्थात, एकीकडे पडझड सुरु असताना कर्णधार मॉर्गन मात्र ठाण मांडून उभा राहिला. त्याने 35 चेंडूत 5 चौकार व 6 षटकारांसह नाबाद 68 धावांचे योगदान दिले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळेच केकेआरला 191 धावांपर्यंत सहज मजल मारता आली. राजस्थानतर्फे राहुल तेवातियाने 25 धावात 3 तर कार्तिक त्यागीने 36 चेंडूत 2 फलंदाजांना बाद केले.









