आयपीएल : कोलकात्याला रसेलच्या फिटनेसची चिंता
वृत्तसंस्था/शारजा
लागोपाठ दोन विजय मिळविल्याने कोलकाता नाईट रायडर्सची गाडी रूळावर आलेली असली तरी नवसंजीवनी मिळालेल्या कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरविरुद्ध सोमवारी होणाऱया सामन्यात किंचित चूकही त्यांना महाग पडू शकते. आयपीएलमधील हा साखळी सामना सायंकाळी 7.30 पासून सुरू होईल.
दोन्ही संघांनी सहापैकी चार सामने जिंकून समान गुण मिळविले असले तरी नेट रनरेटमध्ये केकेआर आरसीबीपेक्षा किंचित वरचढ आहे. फलंदाजीतील सातत्याचा अभाव हा या दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे. चेन्नई व पंजाबविरुद्ध पाठोपाठ दोन मिळवित केकेआरने तिसरे स्थान मिळविले असून ही घोडदौड या सामन्यातही कायम ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. याउलट धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईविरुद्ध 37 धावांनी विजय मिळविल्याने आरसीबीचे मनोबलही उंचावलेले आहे. त्यामुळे तेही विजयाचा जोम कायम राखण्याचाच प्रयत्न करतील. केकेआरसाठी स्फोटक फलंदाज आंद्रे रसेलची उपलब्धता हा चिंतेचा मुद्दा असेल. शनिवारी पंजाबविरुद्धच्या सामन्यात झेल टिपण्यासाठी सूर मारल्यानंतर जाहिरात बोर्डाला आदळल्याने त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. कर्णधार दिनेश कार्तिकनेही त्याच्या दुखापतीच्या स्वरूपाबद्दल काहीही उघड केलेले नाही.
केकेआरच्या फलंदाजांना यावर्षीच्या आयपीएलमध्ये सातत्य राखता आलेले नाही. सलामीवीर शुभमन गिलने दोन अर्धशतके झळकावत चांगले प्रदर्शन केले तर सुनील नरेनच्या जागी सलामीला आलेल्या राहुल त्रिपाठीने चेन्नईविरुद्ध 81 धावा फटकावल्यानंतर पंजाबविरुद्ध तो अपयशी ठरला. नितिश राणा अधूनमधून चमक दाखवतो तर इयॉन मॉर्गनही अडखळताना दिसत आहे. कर्णधार कार्तिकवर फलंदाजीतील अपयशाबद्दल टीका केली जात होती. पण त्यानेही पंजाबविरुद्ध 29 चेंडूत 58 धावांची उपयुक्त खेळी केली आहे. त्यांच्या गोलंदाजांनी मात्र गेल्या दोन सामन्यात शानदार कामगिरी केली असून पराभवाच्या जबडय़ातून त्यांनी विजय खेचून आणले आहेत. त्यामुळे आरसीबीविरुद्ध खेळताना त्यांचा आत्मविश्वास खूपच उंचावलेला असेल.
आरसीबीसाठी सर्वात दिलासा देणारी बाब म्हणजे कर्णधार कोहलीला मिळालेला फॉर्म. सुरुवातीला त्याचे खराब प्रदर्शन झाले होते. गेल्या सोमवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात आरसीबीरला 53 धावांनी मोठा पराभव स्वीकारावा लागला होता, त्यात कोहलीने एकाकी लढत देताना 39 चेंडूत 43 धावा काढल्या होत्या. त्यानंतर चेन्नईविरुद्ध मात्र त्याने 90 धावांची विजयी खेळी केली. तो व पडिक्कल वगळता त्यांचे अन्य फलंदाज अपयशी ठरले होते. पडिक्कल चांगल्या टचमध्ये असल्याचे दिसून आले आहे. मात्र सुरुवातीला काही सामन्यात चमक दाखविलेल्या डीव्हिलियर्सला नंतरच्या सामन्यात हा जोम राखता आलेला नाही. मोठे फटके मारणाऱया फिंचनेही लक्षात राहणारी खेळी केलेली नाही. गोलंदाजीत चहलच्या साथीला अष्टपैलू ख्रिस मॉरिस संघात दाखल झाला असून पहिल्याच सामन्यात त्याने उत्कृष्ट स्विंग मारा करीत प्रतिस्पर्धी फलंदाजांना अडचणीत आणले होते.
संघ : केकेआर : कार्तिक (कर्णधार), मॉर्गन, गिल, बॅन्टन, सुनील नरेन, रसेल, नितिश राणा, राहुल त्रिपाठी, कुलदीप यादव, कमिन्स, पी.कृष्णा, फर्ग्युसन, रिंकू सिंग, कमलेश नागरकोटी, शिवम दुबे, निखिल नाईक, ख्रिस ग्रीन, एम. सिद्धार्थ, संदीप वॉरियर, वरुण चक्रवर्ती, सिद्धेश लाड.
आरसीबी : कोहली (कर्णधार), डीव्हिलियर्स, पार्थिव पटेल, फिंच, जोश फिलिप, ख्रिस मॉरिस, मोईन अली, सिराज, शाहबाज अहमद, पडिक्कल, चहल, सैनी, स्टीन, पवन नेगी, उदाना, दुबे, उमेश यादव, गुरकीरत सिंग मान, सुंदर, देशपांडे, झाम्पा.
सामन्याची वेळ : सायंकाळी 7.30 पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स.









