प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव आणि रायबाग येथील दोन बालकांवर केएलई प्रभाकर कोरे हॉस्पिटल येथील ईएनटी विभागाच्या डॉक्टरांनी कोक्लीअर इन्प्लॉन्ट शस्त्रक्रिया यशस्वी करुन त्यांना दिलासा दिला आहे. या मुलांना जन्मतःच कर्णबधिरत्वाने ग्रासले होते. आणि केवळ शस्त्रक्रिया हाच पर्याय होता.
हॉस्पिटलने सुरक्षा आरोग्य सुवर्ण ट्रस्ट योजनेंतर्गत या शस्त्रक्रिया पूर्ण केल्या. यासाठी बेंगळूरहून डॉ. वासंती आनंद बेळगावला आल्या होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ईएनटी विभागाचे प्रमुख डॉ. ए. एस. हारुगोप्प, डॉ. प्रिती हजारे यांनी ही शस्त्रक्रिया केली. भूलतज्ञ डॉ. केदारेश्वर यांचेही सहकार्य लाभले. या दोन्ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या असून त्या मुलांना लवकरच घरी पाठविण्यात येईल, असे समन्वयक डॉ. प्रिती एस. हजारे यांनी यावेळी सांगितले. या बद्दल केएलईच्या प्रकुलगुरू डॉ. एन. एस. महांतशेट्टी, कुलसचिव डॉ. व्ही. ए. कोठीवाले, वैद्यकीय संचालक डॉ. कर्नल एस. दयानंद यांनी डॉक्टरांची प्रशंसा केली आहे.









