प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावच्या केएलई ऍकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च (काहेर) डीम्ड-टू-बी युनिव्हर्सिटीला सलग तिसऱया फेरीत सीजीपीए 3.39 गुण मिळवून ए प्लस मानांकन मिळाले आहे. या पूर्वीच्या पहिल्या आणि दुसऱया फेरीमध्येसुद्धा काहेरला नॅककडून ए ग्रेड मिळाले आहे. या मानांकनामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यापीठाची प्रतिष्ठा वाढली आहे.
नॅक मान्यता ही एक व्यापक प्रक्रिया आहे. या टीमने विशेष करून माता आणि नवजात संशोधन केंद्राचे कौतुक केले. येथील पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केल्या जात असलेल्या कार्यांबाबत समाधान व्यक्त केले.
या टीमचे चेअरमन डॉ. पी. व्ही. विजयराघवन, रामचंद्र इन्स्टिटय़ूट ऑफ हायर एज्युकेशन ऍण्ड रिसर्च, चेन्नईचे उपकुलगुरु यांनी काहेर येथे उत्कृष्ट शिक्षण, संशोधन आणि हॉस्पिटल सेवा याबद्दल कौतुक केले. डॉ. प्रभाकर कोरे यांच्या दूरदृष्टी नेतृत्त्वामुळेच हे शक्य झाले आहे, असे सांगितले.
यावर्षी या विद्यापीठाला हुबळी येथे नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. या विद्यालयात 150 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल.
नॅकच्या या मानांकनामुळे काहेरच्या शिरपेचाला मानाचा तुराच म्हणता येईल. या सर्व यशाबद्दल कुलगुरु डॉ. प्रभाकर कोरे आणि उपकुलगुरु डॉ. विवेक साबोजी यांनी सर्व टीमचे अभिनंदन केले आहे.









