श्रीकृष्णावर आपण स्यमंतकमणी चोरल्याचा खोटा आरोप केला याची सत्राजिताला जाणीव झाली. भरसभेत कृष्णाने आपल्यावरील आरोप खोटा असल्याचे सिद्ध केले. त्यामुळे सत्राजिताची मोठीच मानहानी झाली. त्याची लाज गेली. तो थरथरू लागला.
सत्राजित जैं लाधला मणि । तैं तेजस्वी सूर्याहूनी ।
तोहीं लज्जति रत्नग्रहणीं । अधोवदनीं गृहा गेला ।
मणि घेऊनि सत्राजित । अधोवदनें लज्जान्वति ।
कृतापराधें परमतप्त । उठिला त्वरित न बोलतां ।
तेणें जाऊनि निजमंदिरिं । एकान्तसदनीं विचार करी।
प्रसेनवियोगदु:खलहरी । हृदयसागरिं हेलावे ।
म्हणे प्रसेनाऐसा बन्धु । परमस्नेहाळ विवेकसिंधु ।
गेला आणि मज हा बाधु । लोकापवादु स्पर्शला ।
आतां कवणेंसीं विचार करूं । केंवि हा दोषाब्धि निस्तरूं ।
लोकापवाद झाला थोरू । पडलें वैर बळि÷sंसीं ।
कोणा उपायें याचें शमन । पुन्हा साधुत्वें वदती जन ।
निर्वैर होवोनि जनार्दन । निजकारुण्यें संगोपी ।
ऐसें अपराधजनित पाप । स्मरोनि विवरी बहु संकल्प ।
तत्परिहरणार्थ अनुतप । विचार अल्प उमजेला ।
क्षणक्षणा विकळ पडे । प्रसेन स्मरोनि दीर्घ रडे ।
एकान्तसदनाचीं कवाडें । लावूनि ओरडे एकाकी ।
सत्राजिताला अत्यंत तेजस्वी असा स्यमंतकमणी पुन्हा मिळाला. त्यामुळे वास्तविक तो तेजस्वी, आनंदी व्हायला हवा. पण आपण केलेल्या अपराधाची जाणीव त्याला मनोमन होत होती. त्याने लज्जित होऊन तो स्यमंतकमणी घेऊन खाली मान घालून घरी गेला. घरी जाऊन एकान्तवासात तो मनोमन घडलेल्या प्रसंगांचा विचार करू लागला. धाकटा भाऊ प्रसेनाच्या वियोगाने त्याच्या मनात दु:खाच्या लहरी वाहू लागल्या. माझा लाडका अत्यंत प्रेमळ विचारी बंधू मी गमावला आणि कृष्णाचा विनाकारण अपमान करण्याचा अपराध माझ्या माथी आला. आता लोक मला दोष देतील आणि बलि÷ यादव माझे वैरी बनतील. आता हा दोष मी कसा निस्तारू? त्याला काही सुचेना. याला उपाय काय? लोकांमध्ये माझी घसरलेली पत पुन्हा कशी मिळवता येईल? सज्जन लोक मला पुन्हा कशी मान्यता देतील? या प्रश्नांचा तो दिवस रात्र विचार करू लागला. आपल्या अपराधाची, पापाची जाणीव होऊन त्याला अनुताप झाला. प्रसेनाचीही आठवण वारंवार होत होती. दरवाजे बंद करून तो एकान्तवासात रडू लागला.
तिये समयीं पतिव्रता । सुभगा साध्वी सुशील वनिता ।
अनन्यभवें अनुकूल कान्ता । ते एकांता पवर्तली ।
सत्राजितातें सावधान । करूनि म्हणे काय हें रुदन ।
प्रसेन पावला निर्वाण । तो परतोन केंवि भेटे ।
आतां स्वस्थ मानस कीजे । हृद्गत मजसीं अनुवादिजे।
मजयोग्य असो नसो तें वदिजे । शंका न धरिजे यदर्थीं।
म्हणे सुशीले शुभानने । हृद्गत जाणसी सर्वाभिज्ञे ।
मम माथांचीं दुर्लाच्छनें । उपायें कोणें निवारती ।
कोणतें कर्म केलें असतां । कृपा उपजेल कृष्णनाथा ।
जनपद दोष न ठेवी माथां । मज देखतां न नोकिती ।
Ad.. देवदत्त परुळेकर








