ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना कोरोनाची लागण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रामदास आठवले यांनी काल कोरोनाची चाचणी केली होती. त्या चाचणीचे रिपोर्ट आज सकाळी पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे त्यानंतर रामदास आठवले यांना मुंबई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आठवले यांना कोणतीही लक्षणे दिसत नसून खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आपल्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन करत आठवले यांनी माझ्या तब्येत ठणठणीत असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, दिग्दर्शक अनुराग कश्यप विरोधात लैंगिक छळवणुकीची तक्रार करणारी अभिनेत्री पायल घोष हिने सोमवारी राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत रिपाइंमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमात जे उपस्थित होते, त्यांनी देखील सतर्क राहण्याचे आवाहन रिपाइंकडून करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेते कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे आणि आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत.