ऑनलाईन टीम / पुणे :
चीनमधून आयात केलेल्या सदोष टेस्टिंग किटमुळे कोरोना चाचण्यांना दिरंगाई झाली. त्याची जबरी किंमत देशाला भोगावी लागली. त्यामुळे केंद्राने आता विलंब न करता छत्तीसगढच्या धर्तीवर टेस्टिंग किट खरेदीचा विचार करावा, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.

रोहित पवार यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. ‘टेस्टिंग किटसाठी अद्याप पैसे दिले नसले तरी खरेदी, वितरण, त्यातील दोष कळण्यात आणि ते परत करण्यात मौल्यवान वेळ वाया गेला. चाचण्यांना झालेल्या दिरंगाईने देशाने आधीच जबर किंमत चुकवली आहे. त्यामुळे अधिक विलंब न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडच्या धर्तीवर टेस्टिंग किटची खरेदी करता येईल का ? याचा विचार करावा,’ असे रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
चीनमधून आयात करण्यात आलेले रॅपिड टेस्टिंग किट सदोष असल्याची तक्रार राजस्थानमधून आली. त्यानंतर पश्चिम बंगलमधूनही हे किट चुकीचे निदान करत असल्याची तक्रार आली. तूर्तास भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने या किट्सचा वापर थांबवण्याचा आदेश दिला आहे. दरम्यान, भारताने दक्षिण कोरियाला 9.5 लाख टेस्टिंग किटची ऑर्डर दिली आहे.








