कृषी कायदा समर्थनार्थ कणकवलीत ट्रक्टर रॅली : प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा सहभाग
प्रतिनिधी / कणकवली:
केंदातील मोदी सरकारने आणलेले कृषी कायदे हे शेतकऱयांच्या जीवनात श्रीमंती आणणारे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या कायद्याच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱयांच्या मनात स्थान मिळवत असल्याने त्यांना विरोध म्हणून मूठभर लोकांना हाताशी धरून दलालांच्या माध्यमातून कायद्याला विरोध केला जात आहे. हे कायदे शेतकरी हिताचे आहेत. शेतकऱयांनी या कायद्यांच्या पाठिशी राहिले पाहिजे. ‘किसान के सन्मान में, भाजप मैदान में’ हा संदेश या मोर्चाच्या माध्यमातून देशात जाऊदे, असे आवाहन करतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य शासनावरही जोरदार टीका केली.
आमदार नीतेश राणे यांच्या संकल्पनेतून मोदी सरकारच्या कृषी कायद्याच्या समर्थनार्थ येथील मुडेश्वर मैदानावरून शेतकऱयांचा ट्रक्टर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात ट्रक्टर, बैलगाडय़ांसह शेतकरी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. ट्रक्टर मोर्चाचे नेतृत्व भाजपचे चंद्रकांतदादा पाटील, माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे, भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनिल बेंडे, माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नीतेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी आमदार प्रमोद जठार, अतुल काळसेकर, ऍड. अजित गोगटे, महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेर्से, कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे आदी सहभागी झाले होते. सदरचा मोर्चा येथील भाजप कार्यालयानजीकच्या मैदानावर आल्यानंतर झालेल्या जाहीर सभेत पाटील बोलत होते.
पाटील म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शेतीतलं काय कळतं? त्यांनी पणन म्हणजे काय ते सांगावे? कृषी विधेयकाला जो विरोध आहे, हा व्यापारी, दलालांचा आहे. शेतकरी माल आणतो, तोच उतरतो, तरीही तोलाई, हमाली कापली जाते. 2017 मध्ये महाराष्ट्र राज्यात आम्ही कायदा आणला. त्यानंतर फळ, भाजी मार्केटच्या बाहेर विकली जाऊ लागली. सावता माळी आठवडा बाजार सुरू केला. त्यामुळे मार्केटबाहेर भाव मिळू लागला. आम्ही स्वतः शेतकरी आहोत. कृषी उत्पन्न बाजार समिती बंद होणार नाही. कायद्यामध्ये मार्केट बंद करीत नाही. करार फक्त शेतीसाठीचा होणार आहे, जमिनीचा नाही. कायद्याच्या चौकटीत राहून न्याय मागण्याची संधी आहे.
नारायण राणे म्हणाले, आर्थिक सबळ बनविण्यासाठी हे कृषी विधेयक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणले. काँग्रेसला 70 वर्षांत जे जमलं नाही, ते भाजपने करून दाखविले. शेतकऱयांनी पिकविलेला माल मार्केटमध्ये विकायला बंदी होती. मोदी सरकारने हे मोडीत काढण्यासाठी हे विधेयक आणले आहे. शेतकऱयांनी राज्य आणि देशात कुठेही माल विकावा.
डॉ. अनिल बोंडे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्ही जे कायदे केले आहेत, त्याला रॅलीने समर्थन दिले. लॉकडाऊन काळात सर्वसामान्य शेतकऱयांना मोंदींनी वाचवलं. अवकाळी पाऊस, वादळ यासाठी शेतकऱयांना उद्धव ठाकरेंनी काय दिले? मोदींनी शेतकऱयांच्या खात्यात थेट पैसे जमा केले. किसान पेडिट कार्ड दिले. 15 हजार कोटींची पॅकेज मच्छीमारांना दिले आहे. कृषी कायदे आदम काळापासून आहेत. ते बदलण्यासाठी व शेतकऱयांना दिलासा देण्यासाठी मोदींनी कृषी विधेयक आणले.
नीतेश राणे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने कृषी विधेयक मंजूर केले आहे. त्या कृषी कायद्यामुळे कोकणातील शेतकऱयांना खऱया अर्थाने आर्थिक समृद्धी प्राप्त होणार आहे. हे विधेयक शेतकऱयांना ताकद देणारे विधेयक आहे. त्यासाठी ट्रक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले. त्याला शेतकऱयांनी मोठा सहभाग घेत या कृषी विधेयकाला पाठिंबा दर्शवला आहे. मोदी सरकारला बदनाम करण्यासाठी काँग्रेस शेतकऱयांच्या आडून या विधेयकाला विरोध करीत असल्याचे नीतेश राणे म्हणाले. कृषी कायद्याला समर्थ देण्यासाठी काढल्या ट्रक्टर रॅलीला महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष व राज्यातील नेते मंडळींनी ताकद दिली. शेतकऱयांच्या भविष्याला आकार देण्यासाठी कृषी विधेयक आले आहे. त्यामुळे शेतकऱयांमध्ये वेगळा उत्साह आहे. या विधेयकामुळे कोकणातील शेतकऱयांना लाभ होणार आहे.
यावेळी राजन तेली यांनीही विचार मांडले. यावेळी संजना सावंत, दीपलक्ष्मी पडते, प्रभाकर सावंत, उपाध्यक्ष गोटय़ा सावंत, प्रज्ञा ढवण, तालुकाध्यक्ष संतोष कानडे, मिलिंद मेस्त्राrr, महेश गुरव, सावी लोके, सोनू सावंत, नगराध्यक्ष संजय परब, प्रियांका साळसकर, राजश्री धुमाळे, मेघा गांगण, सुप्रिया नलावडे, कविता राणे, प्रतीक्षा सावंत, रवींद्र शेटये, दिलीप तळेकर, मनोज रावराणे, भाई परब, बबलू सावंत व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन मिलींद कुलकर्णी यांनी केले. आभार गोटय़ा सावंत यांनी मानले.
डॉ. अनिल बोंडे यांनी आमदार नीतेश राणे यांचे कौतूक केले. राणे यांनी ट्रक्टर मोर्चात ट्रक्टर चालविल्याचा उल्लेख करीत त्यांनी ट्रक्टर शेतकऱयाप्रमाणे कौशल्याने चालविला, असे ते म्हणाले. तर मोर्चाच्या आयोजनाबद्दल चंद्रकांत पाटील, नारायण राणे यांनीही नीतेश राणे यांचे भरभरून कौतूक केले.
देशात फार्मर ऑर्गनायझेनशचे 10 हजार प्रोसेसर सुरू करण्यात येणार आहेत. यात सिंधुदुर्गमध्ये एक प्रोसेसर ऑरगॅनिक भातपिकासाठी व एक फळपिकासाठी घेण्याकरीता पुढाकार घ्या, असे डॉ. बोंडे म्हणाले.
पुण्यात मतदारांची हेराफेरी!
पुणे पदवीधर मतदारसंघात ग्रॅज्युएट नसलेल्या 10 हजार मतदारांची नावे आहेत. तेथे आम्हाला 73 हजार तर तीन पक्षांना एकत्रित येत 1 लाख 20 हजार मिळाली. मतदारांमधील हेराफेरीबाबत आपण लवकरच पत्रकार परिषद घेणार आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.









