भारतीय अन्न महामंडळ यांची माहिती : मार्चच्या मध्यापासून सुरु होणार गहू खरेदी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मार्च महिन्याच्या मध्यापासून गहू खरेदीला सुरुवात होणार आहे. या सत्रात खरेदी सामान्य राहणार असल्याचे भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय) यांनी सांगितले आहे. साधारणपणे ही खरेदी अंदाजे 3 कोटी ते 4 कोटी टन इतकी राहणार असल्याची शक्यता संस्थेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक के.के.मीना यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे.
पिकांची परिस्थिती सामान्य असून तापमान वाढीमुळे पिकाचे कोणतेही नुकसान होणार नाही तसेच गतवर्षीच्या तुलनेत पेरणीचे क्षेत्र अधिक आहे. त्यामुळे सध्या पिकांची स्थिती चांगली असल्याचे मीना यांनी स्पष्ट केले आहे.
कृषी मंत्रालयाचा अंदाज
सरकारने 2023 ते 24 या पीक वर्षात (जुलै ते जून ) मध्ये 11.218 कोटी टन गव्हाचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज कृषी मंत्रालयाने व्यक्त केला आहे. गतवर्षी गव्हाची खरेदी कमी झाली होती. सरकारी आकडेवारीनुसार गेल्या वर्षी 1.879 कोटी टन गव्हाची खरेदी झाली होती. तर 2021 व 22 या काळात 4.334 कोटी टन गव्हाची खरेदी झाल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे.
एफसीआय काय आहे?
एफसीआय ही गहू खरेदी, सामूहिक वितरण प्रणालीमध्ये अन्नधान्य वितरण आणि कल्याणकारी योजनांसाठी सरकारची नोडल एजन्सी आहे. एफसीआयच्या आकडेवारीनुसार भारतीय अन्न महामंडळाने आतापर्यंत तीन लिलावात 18 लाख टन गहू विकण्यात यश मिळवल्याची माहिती आहे.
अंदाजे इतकी खरेदी होण्याचे संकेत
आमची खरेदी साधारणपणे 3 कोटी ते 4 कोटी टनांच्या दरम्यान राहील. गेल्या वर्षी देशांतर्गत उत्पादनात घट व निर्यातीत वाढ झाल्यामुळे गव्हाची खरेदी कमी झाली होती. तापमान वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.









