ऑनलाईन टीम / पुणे :
निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याने मावळ तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी मावळात येऊन या नुकसानीची पाहणी केली तसेच शासकिय अधिकाऱ्यांना पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. दोन दिवसांत शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार असून, त्यामध्ये नुकसान भरपाईबाबत मदत जाहीर केली जाईल. तसेच केंद्राकडेदेखील आर्थिक मदत मागितली असल्याचे पवार यांनी सांगितले.
मावळातील नुकसानीच्या बातम्या सर्वत्र झळकल्यानंतर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज तातडीने पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्यासमवेत मावळचा दौरा केला. मावळचे आमदार सुनील शेळके, प्रांत अधिकारी संदेश शिर्के, तहसीलदार मधुसूदन बर्गे, मावळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष बबनराव भेगडे व शासकीय अधिकारी यांनी आंदरमावळाचा दौरा करत नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या भावना समजावून घेतल्या.








