जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडून केला निषेध
प्रतिनिधी/ बेळगाव
देशभरातील शेतकरी दिल्ली येथे आंदोलन करत आहेत. ते आंदोलन चिरडण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. अनेक शेतकऱयांवर लाठीहल्ला करण्यात आला. त्याचा निषेध म्हणून येथील शेतकऱयांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवसभर धरणे आंदोलन छेडले. केंद्र सरकार शेतकरीविरोधी असून या सरकारमुळे देशातील शेतकरी अडचणीत आल्याचा आरोप यावेळी शेतकऱयांनी केला आहे.
केंद्र सरकारने शेतकरीविरोधी विधेयके मांडली. त्या विधेयकांमुळे शेतकरी कामगार होणार आहे. मोठमोठय़ा कॉर्पोरेट कंपन्या शेतीमध्ये पैसा गुंतविणार आहेत. त्यामुळे शेती भांडवलधारांची होणार आहे. सरकारच्या या जाचक कायद्यामुळे शेतकरी भूमीहीन होणार आहे. तेव्हा तो कायदा रद्द करावा, याचबरोबर एपीएमसी विरोधातही कायदा करण्यात आला आहे. हे सर्व कायदे जाचक आहेत. त्यामुळे शेतकऱयांना मोठा फटका बसणार असून त्यासाठीच शेतकरी त्या कायद्यांना विरोध करत आहेत.
सर्वोच्च न्यायालयानेदेखील शेतकऱयांच्या म्हणण्याचे स्वागत केले आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारने शेतकऱयांचे म्हणणे ऐकून कायद्यामध्ये दुरुस्ती करावी, असे सांगितले असताना अजूनही केंद्र सरकार माघार घेण्यास तयार नाही. लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू असताना केंद्र सरकारने शेतकऱयांवर जो अन्याय केला आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आंदोलनावेळी भजन करून शेतकऱयांनी लक्ष वेधले होते. चुन्नाप्पा पुजेरी, ऍड. नागेश सातेरी, जावेद मुल्ला, जयश्री गुरण्णावर, अखिला पठाण, जी. व्ही. कुलकर्णी, राघवेंद्र नाईक, चंद्रकांत करेण्णावर, गंगय्या पुजेर, शिवलीला मिसाळे यांच्यासह कुली कामगार व शेतकरी उपस्थित होते.









