बँकॉक : भारताच्या किदाम्बी श्रीकांतने आपल्याच देशाच्या सौरभ वर्माचा पराभव करून थायलंड ओपन सुपर 1000 बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱया फेरीत स्थान मिळविले तर पारुपल्ली कश्यपने पहिल्या फेरीच्या सामन्यातून माघार घेतली.
श्रीकांतने सौरभवर 21-12, 21-11 अशी मात केली. या सामन्यात त्याने केवळ 31 मिनिटांत सहज विजय मिळवित आगेकूच केली. मंगळवारी श्रीकांतची कोरोना चाचणी घेण्यात आली त्यावेळी त्याच्या नाकात जखम झाल्याने त्यातून रक्तस्राव होत होता. पीसीआर टेस्टनंतर त्याच्या नाकातून रक्त येत असल्याचे समजल्यानंतर कोव्हिड 19 चाचणी पथकातील डॉक्टरांनीच त्याच्यावर उपचार केले असल्याचे बीडब्ल्यूएफने सांगितले.
सायना नेहवाल व पी. कश्यप यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना खेळण्यापासून वंचित ठेवण्यात आले होते. पण नंतर ते निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना पहिल्या फेरीचे सामने खेळण्याची संधी मिळाली. मात्र कश्यपने चांगला खेळ करूनही तिसऱया गेमवेळी पोटरीचे स्नायू दुखावल्याने माघार घेतली.
कॅनडाच्या जेसन अँथनी हो शुईविरुद्ध खेळताना दोघांनी 9-21 व 21-13 असे एकेक गेम जिंकले होते. तिसऱया गेममध्ये कश्यपने 8-14 असे पिछाडीवर असताना दुखापतीमुळे माघार घेतली. पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक साईराज रनकिरेड्डी व चिराग शेट्टी यांनी दुसरी फेरी गाठताना दक्षिण कोरियाच्या किम जि जुंग व ली याँग दाए यांच्यावर 19-21, 21-16, 21-14 अशी मात केली. दक्षिण कोरियाच्या ली याँग दाएला सात्विक-चिराग आपले आदर्श मानतात आणि त्यांच्यावरच विजय मिळविल्यानंतर त्यांना खूप आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले. अर्जुन एम. रामचंद्रन व धुव कपिला यांचे आव्हान मात्र संपुष्टात आले. त्यांना मलेशियाच्या आँग यू सिन व तेवो ई यी यांच्याकडून संघर्षपूर्ण लढतीत 21-13, 8-21, 22-24 असा पराभव स्वीकारावा लागला.









