अमरिंदर सिंह यांनी सोडला काँग्रेस पक्ष – सोनियांना पाठविले 7 पानी राजीनामापत्र
वृत्तसंस्था / लुधियाना
दिवाळीपूर्वी कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी पंजाबमध्ये राजकीय धमाका केला आहे. मंगळवारी त्यांनी औपचारिक स्वरुपात काँग्रेसला रामराम ठोकला आहे. तसेच स्वतःचा नवा पक्ष ‘पंजाब लोक काँग्रेस’ची (पीएलसी) माहिती दिली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठविलेल्या 7 पानांच्या राजीनाम्यात त्यांनी स्वतःच्या पूर्ण राजकीय प्रवासाचा उल्लेख केला आहे. अमरिंदर यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींसोबत नवज्योत सिंह सिद्धू यांच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
अमरिंदर यांनी 18 सप्टेंबर रोजी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतरच त्यांनी काँग्रेस सोडण्याची घोषणा केली होती. पंजाबमधील सर्व 117 जागांवर आपला पक्ष निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी यापूर्वीच सांगितले आहे. निवडणुकीपूर्वी शेतकरी आंदोलनावर तोडगा काढू. त्यानंतर भाजप आणि अकाली दलाच्या नाराज नेत्यांशी आघाडी करणार असल्याचे अमरिंदर यांनी म्हटले हेते.
नवज्योत सिंह सिद्धू यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष करण्याच्या निर्णयावर अमरिंदर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. माझ्या आणि पंजाबच्या सर्व खासदारांच्या विरोधानंतरही सिद्धू यांना जबाबदारी देण्यात आली. सिद्धू हे पाकिस्तानसमर्थक असून त्यांनी जाहीरपणे पाकिस्तानचे सैन्यप्रमुख आणि पंतप्रधान इम्रान खान यांनी गळाभेट घेतली होती. हे दोघेही भारतात दहशतवाद फैलावण्यासाठी जबाबदार असल्याचे अमरिंदर यांनी म्हटले आहे.
सिद्धूंकडून माझा अपमान
सिद्धू यांनी सातत्याने खासगीत तसेच जाहीरपणे माझा अपमान केला आहे. मी त्यांच्या वडिलांच्या वयाचा होतो, तरीही ते माझ्याविरोधात विधाने करत राहिले. सिद्धू यांच्या विरोधात कारवाई करण्याऐवजी राहुल गांधी आणि प्रियंका वड्रा यांनी सिद्धू यांना पाठिंबा दिल्याचे कॅप्टन म्हणाले.
कॅप्टनचा राजकीय प्रवास
कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी 1977 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर 1978 मध्ये लोकसभा निवडणूक लढवून ते खासदार झाले. ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या विरोधात त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला होता. त्यानंतर त्यांनी अकाली दलात प्रवेश केला होता. राजिंदर कौर भट्टल यांनी 1998 मध्ये अमरिंदर यांना पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश मिळवून दिला होता. त्यानंतर 1999-2002 पर्यंत अमरिंदर हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष होते. 2002-2007 पर्यंत ते मुख्यमंत्री राहिले. 2009 मध्ये प्रचार समिती अध्यक्ष आणि 2010-2013 पर्यंत ते प्रदेशाध्यक्ष राहिले होते. 2012 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर 2014-15 पर्यंत खासदार राहिले. 2017 मध्ये निवडणूक लढवून ते पुन्हा मुख्यमंत्री झाले होते.









