फेब्रुवारीपासून शुल्क आकारणीचा विचार
बेळगाव / प्रतिनिधी
कॅन्टोन्मेंट हद्दीतील विविध ठिकाणी पार्किंग करण्यात येणाऱया वाहनधारकांकडून पार्किंग शुल्क आकारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. कॅन्टोन्मेंट हद्दीतील एकूण 17 ठिकाणी पार्क करण्यात येणाऱया वाहनधारकांकडून शुल्क आकारणी करण्यात येणार आहे. प्रति चार तासाला 10 ते 100 रुपयांपर्यंत शुल्क असणार असून फेब्रुवारी महिन्यापासून आकारणी करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डमधील विकासकामे राबविण्यासाठी केंद्र शासनाकडून निधी मंजूर केला जातो. पण मागील तीन वर्षांपासून संरक्षण खात्याकडून विकासकामे राबविण्यासाठी निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे विकासकामे ठप्प झाली आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्डला निधीची कमतरता भासत असल्याने उत्पन्न वाढविण्याच्यादृष्टीने विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. दुकान गाळय़ांची भाडेवाढ, तसेच पार्किंग शुल्क आकारणी, जाहिरात कर आणि मालमत्ता करात वाढ करून कॅन्टोन्मेंटचे उत्पन्न वाढविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. कॅन्टोन्मेंट हद्दीतील प्रत्येक रस्त्यावर दुचाकी, तीन चाकी, चार व सहा चाकी वाहने पार्क केली जातात. त्या वाहनांकडून शुल्क आकारणी करण्याची तरतूद प्रस्तावात करण्यात आली आहे. कॅन्टोन्मेंट हद्दीतील महत्त्वाचे रस्ते आणि जागा शुल्क आकारणीसाठी निश्चित करण्यात आल्या आहेत. एकूण 17 ठिकाणी पार्क करण्यात येणाऱया प्रत्येक वाहनाकडून शुल्क वसूल करण्यात येणार आहे. फेब्रुवारी महिन्यापासून ही शुल्क आकारणी करण्याचा विचार कॅन्टोन्मेंट बोर्डने चालविला आहे.
यापूर्वी काही ठरावीक ठिकाणी पार्क करण्यात येणाऱया वाहनधारकांकडून शुल्क आकारणी केली जात असे. पण आता दुचाकीसह सर्व प्रकारच्या अवजड वाहनांकडून शुल्क आकारणी केली जाणार आहे. एकदा पार्किंग फी दिल्यानंतर चार तासापर्यंत वाहन पार्क करण्याची मुभा राहणार आहे. त्यानंतर पुन्हा पार्किंग शुल्क द्यावे लागणार आहे.
पार्किंग शुल्क आकारणीसाठी निश्चित करण्यात आलेली ठिकाणे-
- किल्ला जनावर मार्केट
- कलादगी रोड (दोन्ही बाजू)
- हेड पोस्ट रोड
- बेवूर रोड
- वेंगुर्ला रोड
- वेंगुर्ला रोड सेंट झेवियर्स हायस्कूलसमोर
- रेल्वेस्टेशन समोरील रस्ता (दोन्ही बाजू)
- रेल्वेस्टेशन बसथांबा
- धर्मवीर संभाजी चौक बी. सी. 126 समोर
- आरटीओ रोड (दुतर्फा)
- 32 ओल्ड मोची लाईन समोरील जागा
- कॅन्टोन्मेंट बोर्ड ऑफीस समोरील जागा
- फिश मार्केट समोरील मटण बुचर स्ट्रीट
- बी. सी. नं. 84, 124, 150.
- नॉर्थ टेलिग्राफ रोड
- बी. सी. नं. 147 समोर
- क्लब रोड व सीपीएड्समोरील रस्ता व मिलिटरीच्या जागेसहीत









