अलीन्स बॅडमिंटन स्पर्धा – बेन लेन-सीन व्हेन्डी यांना जेतेपद
वृत्तसंस्था/ पॅरिस
भारताच्या कृष्णा प्रसाद गरग व विष्णू वर्धन गौड यांनी पहिला गेम जिंकूनही त्याचा लाभ उठवता न आल्याने अर्लीन्स मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरीचे जेतेपद पटकावण्याची त्यांची संधीही हुकली आणि त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. इंग्लंडच्या बेन लेन व सीन व्हेन्डी यांनी पुरुष दुहेरीचे जेतेपद पटकावले.
कृष्णा व विष्णू ही भारताची एकमेव जोडी अंतिम फेरीपर्यंत पोहोचली होती. अन्य भारतीय खेळाडूंचे आव्हान याआधीच संपुष्टात आले होते. त्यांना जेतेपदाच्या लढतीत चौथ्या मानांकित लेन व व्हेन्डी यांच्याकडून 21-19, 14-21, 19-21 असा 56 मिनिटांच्या खेळात पराभव पत्करावा लागला. या स्पर्धेत विष्णू व कृष्णा यांनी पहिल्यांदाच एकत्र खेळताना उपविजेतेपदापर्यंत मजल मारली. 21 वर्षीय कृष्णा हा भारताचा दुहेरीतील अग्रमानांकित खेळाडू असून तो कनिष्ठ स्तरावर सात्विकराजसमवेत एकत्र खेळत असे. आता सात्विकने चिराग शेट्टीसमवेत जोडी जमविली असल्याने कृष्णाने नोव्हेंबर 2016 पासून धुव कपिलासमवेत खेळायला सुरुवात केली. अडीच वर्षानंतर 2019 मध्ये ते विभक्त झाले. 20 वर्षीय विष्णूनेही कनिष्ठ स्तरावर अन्य भारतीय खेळाडूंसमवेत दुहेरीत खेळला होता. इशान भटनागरसमवेत त्याने 2019 मध्ये झालेल्या बल्गेरियन ज्युनियर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती. विष्णूची ही वरिष्ठ स्तरावरील पहिलीच स्पर्धा आहे.









