कुरुंदवाड/प्रतिनिधी
राधानगरी कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह शिरोळ तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून पडलेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत सहा फुटाने वाढ झाली आहे.
बऱ्याच दिवसाच्या पावसाच्या विश्रांती नंतर गेल्या चार दिवसापासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे गेल्या दोन दिवसात धरण पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला यामुळे तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली असून नदीकाठच्या शेती पंपाच्या मोठारी काढण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे.
दरम्यान पंचगंगा नदीवरील शिरोळ तालुक्यातील शेवटच्या तेरवाड बंधारा येथून पुढे कृष्णा नदीत 16 हजार 730 क्यूसेक्स प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग होत असून तेरवाड बंधारा येथे पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी ची उंची बुधवारी सायंकाळी 36 फूट इतके नोंदवली गेली तर कृष्णापंचगंगासंगम कुरुंदवाड घाट येथून पुढे 32 हजार 159 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग पुढे सुरू असून येथे पाण्याची पातळी आज सायंकाळी 21.5 इंच इतकी नोंदवली गेली.
दरम्यान पंचगंगेचे पाठोपाठ कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर समोर असणाऱ्या घाटांच्या पायरीपर्यंत पुराचे पाणी येऊन ठेपले आहे. कोरोना संसर्गाच्या संकटाच्या पाठोपाठ पाण्याची पातळी वाढल्याने पुन्हा एकदा महापुराचे सावट तालुक्यावर दिसू लागल्याने पूरग्रस्त नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.