प्रतिनिधी/ बेळगाव
शेतकऱयांना कृषिपंपांसाठी अवघ्या 50 रूपयांमध्ये कनेक्शन देण्यात आले होते. परंतु त्या शेतकऱयांना आता देखभाल व ट्रान्सफॉर्मवरील भार कमी करण्यासाठी 10 हजार तर प्रत्येक एचपीसाठी 1350 रूपये डिपॉझिट भरावे लागणार आहे. नोव्हेंबर अखेर पर्यंत ही रक्कम हेस्कॉमच्या कार्यालयात भरावयाची आहे. ही रक्कम भरल्यानंतर त्या भागांमध्ये ट्रान्सफॉर्मर, विद्युत खांब, नव्या वाहिन्या घालण्यात येणार आहेत.
सन 2018 मध्ये कृषि पंपांसाठी अवघ्या 50 रूपयांमध्ये थ्री फेज विद्युत कनेक्शन देण्यात आले होते. त्यावेळी अनेक शेतकऱयांनी कनेक्शन घेतली. परंतु एकाच ट्रान्सफॉर्मवर भार पडू लागल्याने दुरूस्तीचे काम वारंवार करावे लागत आहे. तसेच अपघातही घडत आहेत. शेतांमध्ये ट्रान्सफॉर्मरची संख्या अत्यंत कमी असल्यामुळे कृषी पंपांच्या कनेक्शनची संख्या वाढत आहे. यामुळे अपघातांचे प्रकार वारंवार घडत आहेत.
या निधीतूनच होणार विकासकामे
हेस्कॉमकडून विकासनिधी म्हणून 10 हजार घेण्यात येत आहेत. ज्या ठिकाणी एकाच ट्रान्सफॉर्मरवर जास्त कनेक्शन आहेत. ती कमी करून नविन ट्रान्सफॉर्मवर कनेक्शन देण्यात येणार आहे. नविन ट्रान्सफॉर्मर, खांब व वीज वाहिन्या घालण्यात येणार आहेत. लॉकडाऊनच्या काळात ही रक्कम भरण्यास सांगण्यात आली होती. परंतु शेतकऱयांनी मुदतवाढ करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती. त्यांनतर आता ही रक्कम शेतकऱयांना भरावी लागणार आहे.
थेट हेस्कॉम कार्यालयात संपर्क साधावा
विकास निधी व डिपॉझिट रक्कम हेस्कॉमच्या उपकेंद्रावर येवून भरावयाच्या आहेत. काही एजंट शेतकऱयांकडून अधिकच पैसे उकळत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱयांनी नेहरू नगर येथे तर पूर्व भागातील शेतकऱयांनी गांधीनगर येथील हेस्कॉम कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
व्ही. जी. नाईक (सहाय्यक कार्यकारी अभियंता, हेस्कॉम ग्रामीण)
शेतकऱयांना केवळ 50 रूपये घेवून कृषिपंप यापूर्वी देण्यात आले होते. परंतु आता ट्रान्सफॉर्मरचा भार वाढत असून अनेक समस्या येत आहेत. त्यामुळे एका ट्रान्सफॉर्मरमधून काही मोजकीच कनेक्शन देण्यात येणार आहेत. यासाठी प्रत्येक कृषिपंपधारकाकडून विकासनिधी म्हणून 10 हजार व प्रत्येक एचपीला 1 हजार 350 रूपये डिपॉझिट घेण्यात येणार आहे. शेतकऱयांनी सुरळीत विद्युत पुरवठय़ासाठी ही रक्कम लवकर भरावी, असे आवाहन त्यांनी केले.