प्रतिनिधी / विटा:
कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहून शासनाने निर्बंध कडक केले आहेत. मात्र आता यातून कृषी सेवा निगडित दुकानांना सवलत मिळणार आहे. याबाबत सांगली आणि रायगड जिल्हाधिकाऱयांचा पॅटर्न राज्यात लागू होणार आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमिवर कृषी सेवा निगडित दुकानांना सकाळी सात ते सायंकाळी सात पर्यंत सवलत देण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी स्थानिक पातळीवर आदेश काढावेत असे कृषी आयुक्तांनी सूचित केले आहे. त्यामुळे कृषी आस्थापनांसाठी सांगली जिल्हाधिकाऱयांचा पॅटर्न आता राज्यभर आमलात येणार आहे.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने ‘ब्रेक द चेन’ या नावाने आदेश दिलेले आहेत. त्यामध्ये कृषि सेवा विषयक दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतू खरीप २०२१ च्या अनुषंगाने कृषि कार्यामध्ये समन्वय आवश्यक आहे. तसेच बियाणे, खते, किटकनाशके आणि कृषि साहित्यांचा अडथळारहित पुरवठा होणे गरजेचे आहे. या उपक्रमाबाबत प्राधान्याने अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक ते निर्देश कृषि आयुक्त स्तरावरुन देण्याचे सूचित करण्यात आले होते. त्यानुसार कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी राज्यातील जिल्हाधिकारी याना आता याबाबत निर्देश देत आपल्या स्तरावर स्थानिक पातळीवर आदेश देण्याच्या सूचना केल्या आहेत.
शेतक-यांच्या दृष्टीने खरीप हंगाम अत्यंत महत्वाचा असतो. मे महिन्यात वळीव अथवा हंगामपूर्व पाऊस झाल्यानंतर शेतकरी शेती मशागतीला सुरुवात करीत असतात. पावसाला सुरुवात झाल्यानंतर कृषि सेवा केंद्रावर खरेदीसाठी शेतक-यांची गर्दी होते. त्यामुळे अशा परिस्थितीत दुकाने सकाळी ७ ते ११ या ळेतच उघडी ठेवल्यास दुकानांवर गर्दी होवुन कोवीड-१९ चा प्रसार वाढण्याच्या भितीबरोबरच अनावश्यक इतरही समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. या बाबींचा विचार करून रायगड व सांगली जिल्हाधिकारी यांनी कृषिविषयक दुकाने उघडण्याच्या वेळेत शिथिलता दिलेली आहे. त्यामुळे शेतीशी निगडीत असलेली कृषि सेवा केंद्र चालू ठेवण्याबाबत व त्याच्याशी निगडित उत्पादन व वाहतुक चालू ठेवण्यास सकाळी ७ ते सायंकाळी ०७ वाजेपर्यंत चालु ठेवणे. प्राप्त परिस्थितीत बांधावर निविष्ठा वाटप, इ-कॉमर्स (ऑनलाईन विक्रो) इ पध्दतीने कमीत कमी संपर्कात शेतक-यांना निविष्ठा उपलब्ध होतील, यादृष्टीने तसे आदेश आपले स्तरावरून स्थानिकरित्या निर्गमित करावेत, असे कृषी आयुक्तांनी आदेशात म्हंटले आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्व दुकानांना निर्बंध लागू होते. मात्र आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी सेवा आस्थापनांमध्ये सकाळी सात ते अकरा या वेळेत खते, बियाणे, औषधे यासाठी गर्दी वाढून पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका होता. त्याचा विचार करून सांगली जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी कृषी सेवा आस्थापनाना सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत मुदतवाढ दिली होती. यामुळे शेतकऱ्याना खरेदीसाठी वेळ मिळून गर्दी टाळणे शक्य झाले होते. याच सांगली पॅटर्नचा विचार करून कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी आता राज्यासाठी असा पॅटर्न राबवण्याबाबत स्थानिक पातळीवर आदेश देण्याच्या सूचना केल्या आहेत.









