हाडांच्या कर्करोगाशी लढून त्यावर मात करणारी 29 वर्षीय अमेरिकन महिला हेली आर्सीनॉक्स जगातील पहिल्या ऑल सिव्हिलियन स्पेस मिशन ‘इन्स्पिरेशन-4’मध्ये सामील असलेली सर्वात कमी वयाची महिला ठरणार आह. यापूर्वी 1983 मध्ये सॅली राइड यांनी अंतराळाचा प्रवास केला होता, तेव्हा त्यांचे वय 32 वर्षे होते.
इन्स्पिरेशन-4 मोहीम ऑक्टोबरमध्ये नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून प्रक्षेपित होणार आहे. हेलीला कर्करोगाशी झुंज आणि त्यावर मात करण्याच्या निश्चयानेच अंतराळ मोहिमेसाठी प्रेरित केले आहे. उत्साह असेल तर आकाशाला कुठलीच सीमा नसते. कुठलाही आजार माणसाला मोठी झेप घेण्यापासून रोखू शकत नसल्याचा संदेश हेली देऊ इच्छिते. हेलीला नीट चालता येत नाही, तिच्या पायांमध्ये वेदना होत असतात.
हेलीने वयाच्या 10 व्या वषीं अमेरिकेच्या मेम्फिस सिटीच्या सेंट जूड चिल्ड्रन्स रिसर्च हॉस्पिटलमध्ये गुडघा प्रत्यारोपण आणि डाव्या मांडीत टायटेनियम रॉड बसविण्यासाठी शस्त्रक्रियेला तोंड दिले होते. हेली आता याच रुग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत आहे. अंतराळात कृत्रिम अवयवासोबत पोहोचणारी ती पहिली व्यक्ती असेल.









