प्रा. रमेश आढाव / फलटण :
फलटण तालुक्याच्या पश्चिम भागातील पाडेगांव या गावातील सर्वसामान्य ग्रामीण कुटुंबातून पुढे आलेल्या फलटण पंचायत समितीच्या कृतीशिल उपसभापती रेखा बाबासाहेब खरात सध्या पंचायत समितीच्या माध्यमातून कार्यरत आहेत. आपल्या पदाचा वापर गण, गट व तालुक्यासाठी करीत आहेत. विकासकामाच्या माध्यमातुन त्यांनी आपले कर्तृत्व सिध्द केले आहे.
फलटण तालुक्याचे नेते विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या आशीर्वादाने तसेच जिल्हा परिषद समाजकल्याण समितीचे माजी सभापती अशोकराव खरात (आण्णा) व बाबासाहेब खरात सर यांच्या सहकार्याने पाडेगाव गणाच्या विद्यमान सदस्या व फलटण पंचायत समितीच्या उपसभापती रेखाताई बाबासाहेब खरात यांनी अल्पावधीत फलटण तालुक्याच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात उपक्रमशील कर्तबगारीने काम केल्याने खऱया अर्थाने त्या उपसभापतीच्या रूपातील कृतिशील नवदुर्गा ठरल्या आहेत.
सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून अनेकांच्या मदतीला धावून जाणाऱया व निरपेक्ष भावनेने समाजसेवा करणाऱ्या उपसभापती म्हणून त्याना संपूर्ण फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यात ओळखले जाते. त्यांच्या कार्यपद्धतीचा गोडवा फलटण तालुक्यात गायला जात असून सर्वसामान्य महिलांसाठी त्यांनी विविध योजना राबवून एक आदर्श निर्माण केला आहे. महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी आजपर्यंत महिला बचत गट स्थापन करून त्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले आहेत. सामाजिक कार्य करण्याची त्यांच्या परिवाराकडून मिळालेली प्रेरणा घेऊन त्यांनी सामाजिक कार्य केले आहे. एक महिला तालुक्यात आदर्श काम उभे करते हे त्यांनी प्रत्यक्ष आपल्या कृतीतुन दाखविले आहे. कोरोना संकट काळात त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांसाठी काम केले व आजही अव्याहत करत आहेत.

सभापती श्रीमंत रामराजे, श्रीमंत संजीवराजे, श्रीमंत रघुनाथराजे, श्रीमंत शिवरूपराजे, अशोकराव खरात (आण्णा), बाबासाहेब खरात यांचे मार्गदर्शन व सहकार्यातून तालुक्यातील अनेक गरजूंना त्यांनी आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. 14 मार्च 2017 पासून पाडेगाव गणाच्या सदस्य म्हणून कार्यरत आहेत. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या आशीर्वादाने रेखा खरात यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन 31 डिसेंबर 2019 साली फलटणच्या उपसभापतीपदी काम करण्याची त्यांना संधी मिळाली.
उपसभापतीपदाची जबाबदारी आणि जाणीव म्हणून त्यांनी तालुक्याच्या विकासाची कामे फलटण पंचायत समितीचे सभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर- निंबाळकर यांच्या सहकार्याने त्या पार पाडत आहेत. पाडेगाव गणासह संपूर्ण फलटण तालुक्यात पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या विविध योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत. समाजकल्याण महिला बालकल्याण, कृषी, आरोग्य, आणि शिक्षण विभागाच्या अनेक योजना सर्वसामान्य कुटुंब केंद्रबिंदू मानून लोककल्याणकारी भावनेतून पूर्णत्वास नेत आहेत. पंचायत समिती 14 वा व 15 वा वित्त आयोग प्रारूप आराखडय़ातून अनेक पायाभूत सुविधा रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आणि आरोग्य सेवा आदी प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला.
रेखाताई स्वतः शिक्षित असून उत्तम वक्त्या आहेत. त्यांचे पती पाडेगाव ग्रामपंचायत व तंटामुक्तीचे अध्यक्ष बाबासाहेब खरात सर यांचे नेहमी त्यांना पाठबळ असते. एकात्मिक बालविकास योजनेच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना पोषण आहार तसेच बाल आनंद मेळावा यातून प्रबोधन केले आहे. त्यांनी सर्वसामान्य लोकांचा, आदरणीय नेतृत्वाचा, सहकाऱयांचा, आणि कुटुंबाचा विश्वास सार्थ ठरविला आहे. म्हणून त्या खऱया अर्थाने सर्वगुण संपन्न कर्तृत्वान महिला ठरल्या आहेत.









