वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्याप्रकरणावरून आंतरराष्ट्रीय न्यायालयात फसलेल्या पाकिस्तानात आता याता आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. यापूर्वीच्या नवाज शरीफ सरकारने कुलभूषण यांच्या प्रकरणी निष्काळजीपणा केला असल्याचा आरोप विदेशमंत्री शाह महमूद कुरैशी यांनी केला आहे. कुलभूषण यांच्याशी संबंधित विधेयक संसदेत संमत करविण्याप्रकरणी स्पष्टीकरण देताना शाह यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताचा डाव हाणून पाडण्यासाठी असे केले जात असल्याचा दावा केला आहे.
आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे आदेश आणि शिफारसी लागू करण्यासाठी इम्रान खान सरकारने पावले उचलली असल्याचे कुरैशी म्हणाले. यापूर्वी विरोधी पक्षांनी कुलभूषण यांच्याशी संबंधित विधेयक सादर केले जात असताना मोठा गोंधळ घातला होता. इम्रान सरकार कुलभूषण यांचे प्रकरण योग्यप्रकारे हाताळण्यास अपयशी ठरल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता.
कुलभूषण यांना मोठा दिलासा
आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारत पाकिस्तानला अडकवू पाहत असल्याचे कुरैशी यांनी म्हटले आहे. यापूर्वी पाकिस्तानात मृत्युदंड ठोठावण्यात आलेला भारतीय नागरिक कुलभूषण यांना मोठा दिलासा मिळाला होता. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या दबावासमोर झुकत पाकिस्तानच्या संसदेने कुलभूषण यांना वरिष्ठ न्यायालयात दान मागण्याची मंजुरी देणारे विधेयक संमत केले होते. सैन्य न्यायालयाकडून मृत्युदंड ठोठावण्यात आलेल्या कुलभूषण यांना दाद मागण्याचा अधिकार नव्हता. कुलभूषण यांना भारतीय हेर ठरवत पाकिस्तानच्या सैन्य न्यायालयाने मृत्युदंड ठोठावला होता. तर भारताने पाकिस्तानचा दावा फेटाळत कुलभूषण यांचे इराणच्या चाबहार बंदरावरून अपहरण करण्यात आल्याचे म्हटले होते.









