कणबर्गी योजनेचे काम सुरू करण्यास बुडाचा हिरवा कंदील : 1 कोटी 80 लाखाच्या शिलकी अर्थसंकल्पास मंजुरी
प्रतिनिधी /बेळगाव
बुडाच्यावतीने राबविण्यात येणाऱया कणबर्गी योजनेतील कामाची सुरुवात करण्यास हिरवा कंदील देण्यात आला आहे. तसेच 1 कोटी 80 लाखाच्या शिलकी अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली. कुमारस्वामी लेआऊट महापालिकेकडे हस्तांतर करण्याचा निर्णयदेखील बुडाच्या बैठकीत घेऊन विविध विषयांना मंजुरी देण्यात आली.
बुडाची सर्वसाधारण बैठक सोमवारी पार पडली. नवनिर्वाचित अध्यक्ष संजय बेळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली असून विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली. बुडाची बैठक झाली नसल्याने मार्च महिन्यात अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली नव्हती. अध्यक्षपदावरून निर्माण झालेल्या वादामुळे कोरमअभावी बुडाच्या बैठका रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अर्थसंकल्पासह विविध विकासकामे आणि कणबर्गी रहिवासी वसाहत योजना मंजुरीच्या प्रतीक्षेत होती. अखेर अध्यक्ष बदलाच्या घडामोडीनंतर बुडाच्या बैठकीला मुहूर्त मिळाला. सोमवारी आयोजित केलेल्या बैठकीच्या अजेंडय़ावर कणबर्गी वसाहत योजनेबाबत चर्चा करण्यात आली. ही योजना राबविण्यासाठी हद्द निश्चित करणे आणि सपाटीकरण करण्यासाठी बैठकीत मंजुरी देऊन योजना लवकर मार्गी लावण्यात यावी, असा ठराव करण्यात आला.
विविध विकासकामे, जागांच्या विनियोगात बदल
बैठका रद्द झाल्याने अर्थसंकल्पाविना बुडाचा कारभार चालला होता. अर्धे वर्ष संपल्यानंतर अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली असून एक कोटी 80 लाखाचा शिलकी अर्थसंकल्प मांडण्यात आला. याला बैठकीत मंजुरी देण्यात आली. तसेच विविध विकासकामे, जागांच्या विनियोगात बदल आणि लेआऊटना मंजुरी देण्यात आली. बुडाने निर्माण केलेली कुमारस्वामी लेआऊट रहिवासी वसाहत महापालिकेकडे हस्तांतर करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. पण विविध विकासकामे अर्धवट असल्याने हस्तांतर रखडले होते. बुडाच्या निधीमधून विकासकामे राबविण्यात आली असून उर्वरित विकासकामे सहा महिन्यांत पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे कुमारस्वामी लेआऊटचा हस्तांतर प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच विविध विकासकामे राबविण्यास बैठकीत मंजुरी देण्यात आली.
बैठकीला जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, बुडा आयुक्त प्रितम नसलापुरे, बुडाचे अधिकारी, मनपा आयुक्त रुदेश घाळी आदींसह बुडाचे सरकारनियुक्त सदस्य उपस्थित होते.