अनन्या बिर्ला यांच्यासोबत अमेरिकेत गैरवर्तन : ट्विटरवर मांडला अनुभव : वॉशिंग्टनच्या रेस्टॉरंटवर आरोप
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेत काही दिवसांपूर्वीच जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूनंतर ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर आंदोलन आणि वर्णभेदाचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला होता. हा मुद्दा अद्याप शांत झालेला नसतानाच आता भारतीय उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांची कन्या आणि गायिका अनन्या आणि कुटुंबीयांसोबत वर्णद्वेषाचा प्रकार घडला आहे. हे प्रकरण अमेरिकेच्या वॉशिंग्टन येथील आहे. शहरातील स्कोपा इटालियन रुट्स रेस्टॉरंटने मला कुटुंबासमवेत बाहेर काढल्याचे अनन्या यांनी ट्विट करत सांगितले आहे.
स्कोपा इटालियन रुट्सने मला आणि माझ्या कुटुंबाला स्वतःच्या परिसरातून बाहेर काढले आहे. अत्यंत वर्णभेदी वर्तन झाल्याने मोठे दुःख झाले. वेटरने माझ्या आईसोबत गैरवर्तन केले आहे. रेस्टॉरंटमध्ये अन्नपदार्थांकरता आम्ही 3 तासांची प्रतीक्षा केल्याचे अनन्या बिर्ला यांनी ट्विट करत म्हटले आहे.
रेस्टॉरंटने फेटाळला आरोप
परंतु रेस्टॉरंटने अनन्या यांचे आरोप फेटाळले आहेत. अनन्या आणि त्यांचे कुटुंबीय भोजन करेपर्यंत थांबले होते. मद्य पुरविण्यासाठी प्रांताच्या कायद्याच्या अंतर्गत आवश्यक ओळखपत्र मागितल्यावर वादाची स्थिती निर्माण झाली होती, असा दावा रेस्टॉरंटमधील भागीदार पाब्लो मोइक्स यांनी केला आहे. नंतर सर्वकाही सुरळीत झाले आणि त्यांनी भोजनही केले, याचबरोबर वेटर आणि भोजनाच्या गुणवत्तेचे कौतुकही केल्याचे मोइक्स यांनी म्हटले आहे
अविश्वसनीय : अनन्याची आई
ही अत्यंत चकित करणारी घटना आहे. स्कोपा रेस्टॉरंटकडून अत्यंत हास्यास्पद वर्तन करण्यात आले. अशाप्रकारे कुठल्याही ग्राहकासोबत वर्तन करण्याचा अधिकार नाही असे अनन्या यांची आई नीरजा यांनी ट्विट करत म्हटले आहे. मी असा प्रकार यापूर्वी अनुभवला नव्हता. वर्णभेद अस्तित्वात असून ते वास्तव असल्याचे अनन्या यांचा भाऊ आर्यमान यांनी नमूद केले आहे.
समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया
अब्जाधीशाच्या ट्विटवर सातत्याने प्रतिक्रिया येत आहेत. अनन्या बिर्ला यांच्यासोबत अत्यंत वाईट घडले आहे. ही रेस्टॉरंटसाठी लाजिरवाणी बाब असल्याचे अभिनेता करनवीर बोहरा यांनी म्हटले आहे. काही लोकांनी अनन्या यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया व्यक्त करताना रेस्टॉरंटची खरेदी करण्याची सूचना केली आहे.
अनन्या बिर्लांविषयी…
अनन्या या आदित्य बिर्ला समुहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांच्या कन्या असून गायिका आहेत. अनन्या यांचे पहिले गाणे लिविन द लाइफ 2016 मध्ये समोर आले होते. या गाण्यानंतर त्यांना युनिवर्सल म्युझिक इंडियाने गायिका म्हणून करारबद्ध केले होते. याचबरोबर त्या ई-कॉमर्स कंपनी क्युरोकार्टच्या संस्थापिका तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी देखील आहेत. अनन्या समाजमाध्यमावर सक्रीय आहेत.









