वार्ताहर / कुद्रेमनी
पारंपरिक पद्धतीने रवळनाथ देवस्थानची पालखी मिरवणूक व उत्साही वातावरणात दुर्गामाता दौड काढून कुद्रेमनी गावात यंदाचा नवरात्रोत्सव साजरा करण्यात आला.
गुरुवारी सकाळी प्रचंड उत्साही वातावरणात गावात दुर्गामाता दौड काढण्यात आली. दौडीत मुले, मुली, युवक, मंडळी आदींचा मोठय़ा संख्येने सहभाग होता. गावातील रस्त्यांवर रांगोळय़ांचे सडे, गल्लोगल्ली स्वागत कमानी उभारून गाव सुशोभित करण्यात आले होते.
गावातील मुख्य शिवाजी चौकातून चव्हाटा गल्ली, लक्ष्मी गल्ली, मारुती गल्ली, शिवाजी रोड, टिळकवाडी भागात, नाईकवाडा, रवळनाथनगर, गुरवनगर, हनुमाननगर, मठ गल्ली, साईनगर या भागातून दुर्गामाता दौड काढण्यात आली. सुवासिनींनी गावातील विविध भागात आरती ओवाळून दौडीचे स्वागत केले. दौडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, दुर्गामातेसह देवी-देवतांचा जयजयकार करण्यात आला. गावची दैवते श्रीलक्ष्मी मंदिर, हनुमान मंदिर, मरगुबाई, कार्तिकस्वामी, श्री चव्हाटा, श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, म्हारताळ, श्री रवळनाथ देवस्थान, मठातील अंबाबाई, होळी कामण्णा, नाईकवाडय़ातील दुर्गामूर्ती आदी ठिकाणी देवी-देवतांना पुष्पहार अर्पण करून आरत्यांचे कार्यक्रम झाले. गेले नऊ दिवस गावातील श्री हनुमान, श्री लक्ष्मी, श्री विठ्ठल रखुमाई, श्री रवळनाथ मंदिरात तसेच नाईकवाडय़ातील दुर्गामूर्तीसमोर नित्य भजनी अभंग, पहाटे आरत्या कार्यक्रम होवून जागरणे करण्यात आली होती.
गावडेवस येथील गावचे आराध्यदैवत श्री क्षेत्र रवळनाथ देवस्थानची पालखी गुरुवारी श्री लक्ष्मी मंदिरात दाखल झाली. देवस्की पंच, हक्कदार, मानकऱयांनी पालखीचे विधिवत पूजन करून नगाऱयांच्या गजरात व हर हर महादेवाच्या जयघोषात संपूर्ण गावात पालखी मिरवणूक काढण्यात आली. सुवासिनींनी आरती ओवाळून ठिकठिकाणी पालखीचे स्वागत केले. पालखीला घोडे जुंपून, नारळ देऊन ओलांडय़ाला पडून मोठय़ा भक्तिभावाने नागरिकांनी श्रद्धा समर्पित केली. रात्री भजनी अभंगाच्या गजरात पालखी सोहळा पार पडला.









