कोरोनाग्रस्तांच्या नातेवाईकांची आर्त हाक : बेळगावात विदारक परिस्थिती, ऑक्सिजन तर सोडाच बेडचाही पत्ता नाही
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना महामारीच्या या काळात योग्य नियोजन करून रुग्णांची संख्या आणि मृत्यूचा आकडा नियंत्रित ठेवण्याची जबाबदारी योग्यरित्या पाळली जात नसल्याचेच विदारक वास्तव सामोरे आले आहे. ऑक्सिजन तर सोडाच साध्या बेडचाही पत्ता नाही. यामुळे किंकाळय़ा फोडत ‘कुणी बेड देता का हो बेड’…? असे विचारत फिरण्याची वेळ कोरोनाग्रस्त आणि त्यांच्या नातेवाईकांवर आली आहे. अनेकांचा तडफडून रस्त्यावरच मृत्यू होऊ लागला आहे. ‘नो बेड्स अवेलेबल’ असे सांगून बिम्सनेही हात वर केले आहेत. सामाजिक संस्थांना ऑक्सिजन मिळाला असता तर किमान घरात श्वास टिकवून ठेवता आला असता. मात्र काहीजणांच्या स्वार्थी वृत्तीमुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागत आहेत. अशा परिस्थितीत उदासीन आणि हतबल प्रशासनाने वेळीच पावले उचलली नाहीत तर परिस्थिती आणखी भयानक होणार आहे.
खासगी इस्पितळांमध्ये बेड शिल्लक नाहीत. अनेक खासगी इस्पितळे ऑक्सिजनची जबाबदारी तुमची, असे सांगून हात वर करत आहेत. अशातच एका बोटाला ऑक्सिमीटर लावून मला ऑक्सिजन द्या, अशी विनवणी करत पाच रुग्ण बिम्स प्रशासनाच्या बाहेर उभे होते. जवळच थांबलेल्या एका रुग्णाच्या नातेवाईकाला हा प्रकार पहावला नाही. त्याने आपले वजन वापरुन थेट वैद्यकीय संचालकांना फोन केला. त्यांनी मी काय करु, बेड शिल्लक नाहीत, असेच उत्तर दिले. यावर उपाय काय, असा प्रश्न केला असता मी जिल्हाधिकाऱयांना सांगितले आहे, असे उद्धट उत्तर आले. मुळापर्यंतच जायचे म्हणून त्या व्यक्तीने जिल्हाधिकाऱयांना फोन केला. दरम्यान पर्यायी उपाययोजना होईपर्यंत आम्ही काहीच करू शकत नाही, अशी हतबलता त्यांनी व्यक्त केली. लॉकडाऊन झाला, रुग्ण वाढणार याची शक्मयता होतीच. दरम्यान योग्य नियोजन करायचे कोणी, असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे.
लोक तडफडून मरत असताना अशा परिस्थितीला संयमाने सामोरे जा, इतकेच उत्तर देऊन प्रशासनाची जबाबदारी संपली का, अशी विचारणा सध्या नागरिकांतून होऊ लागली आहे.
ही परिस्थिती का आली?
शहरात मागील वर्षभरात कोरोना रुग्णसंख्या वाढतीच आहे. सर्वांनाच इस्पितळांत जाणे शक्मय नाही. अशा परिस्थितीत घरच्या घरी उपचार घेऊन असंख्य रुग्ण बरे झाले आहेत. यांना आपले फॅमिली डॉक्टर्स आणि घरोघरी जाऊन ऑक्सिजन देणाऱयांनी बरे केले आहे.
जात, धर्म, पंथ यांचा भेदभाव न मानता आपुलकीच्या भावनेतून आणि माणुसकीच्या नजरेतून अनेकांना मदत झाली. मात्र गेल्या काही आठवडय़ात या सामाजिक संस्थांना मिळणारा ऑक्सिजनच रोखण्यात आला. याप्रकारे ऑक्सिजन पुरविणे बेकायेदशीर आहे, असा मुद्दा उपस्थित करून प्रशासनाने ऑक्सिजन निर्मात्यांना या पुरवठय़ावर निर्बंध लावण्याचे आदेश दिले. तेथून घरी बरे होणाऱयांनाही इस्पितळांची वाट शोधण्याची वेळ आली. खासगी इस्पितळांचा दर परवडेना, दर परवडला तरी त्या इस्पितळातील बेड मिळेना आणि सरकारी कोटा नेहमीच फुल्ल अशा परिस्थितीत रुग्णाला घेऊन दरबदर भटकण्याची वेळ बेळगावात आली आहे. या परिस्थितीला जबाबदार ठरणाऱया घटकांनी योग्य वेळेत आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे.
गोष्टी इतक्मया सहज नाहीत
जिल्हाधिकारी आणि बिम्स्च्या संबंधित अधिकाऱयांशी संपर्क साधणारा तो तरुण सांगत होता. या अधिकाऱयांनी गोष्टी अगदी सहजपणे घेतल्या आहेत. रुग्णाला वेळेत उपचार द्यायचे आहेत काय करायचे सांगा, असा प्रश्न विचारूनही त्यावर उत्तर मिळत नाही. रुग्णांची संख्या वाढेल हे माहिती असतानाही कोविड केअर सेंटरच्या संख्येत वाढ झाली नाही. काही ठराविक सामाजिक सेवा संस्था वगळता इतरांना ऑक्सिजन मिळत नाही. लोक मरताहेत तर मरु देत, अशा प्रकारचे चित्र सध्या या वर्तणुकीतून दिसून येत असल्याची संतप्त प्रतिक्रिया त्याने दिली. कोरोना झाला हे दुर्दैव. या दुर्दैवी परिस्थितीत उपचार मिळू शकले नाहीत हे ही मोठे दुर्दैव. दरम्यान अशा परिस्थितीत झालेल्या मृत्यूला ही दुर्दैवी परिस्थिती निर्माण करणारे सर्व घटक जबाबदार असतील, असा आरोपही त्याने उद्विग्नतेतून केला.
नोडल अधिकारी वाऱयावर
कोणत्याही इस्पितळात रुग्णाला योग्य उपचार मिळत नसतील तर संबंधित नोडल अधिकाऱयाला फोन करा, असा एक संदेश देण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात त्या संदेशातील नोडल अधिकारी वाऱयावर असल्याचेच दिसून येत आहे. एकटाही फोन उचलत नाही. यामुळे असाहाय्य अवस्थेत मदतीची आशा धरून पडून राहण्याची वेळ असंख्य रुग्णांवर आली आहे. कोरोना होऊ नये म्हणून काळजी घेण्यापलिकडे सध्या दुसरा कोणताच सुरक्षित पर्याय शिल्लक राहिलेला नाही. कोरोना झाला तर योग्यवेळी उपचार मिळतील आणि आपण बरे होऊन पुन्हा आपल्या घरी येऊ शकू, याची खात्री देता येत नाही, असेच वातावरण सध्या पहायला मिळत असून याबद्दल समाजातील सर्व स्तरातून प्रचंड चीड व्यक्त होत आहे.
स्मशानभूमीतही नाही जागा
उपचारासाठी धडपड करणाऱया रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्ण दगावल्यानंतर मोठय़ा त्रासाला सामोरे जावे लागत आहे. जवळची व्यक्ती गेली, त्याच्या उपचारासाठी केलेला खर्चही गेला आणि त्याच्यावर अंत्यविधी करण्यासाठी स्मशानभूमीत जागा नाही, असे चित्र पहायला मिळते. हेल्प फॉर निडी, अल इक्रा सारख्या काही संघटना मदत करताहेत. अन्यथा स्मशानभूमीत जागा शोधण्याची वेळही भविष्यात नागरिकांवर येऊ शकते. या वातावरणात वाढीव धोक्मयांचे संकट ओळखून योग्य व्यवस्था पुरविणारी यंत्रणा अस्तित्वात येणे हीच मोठी गरज आहे.
आदर्श घेण्याची गरज
बेळगाव जिल्हय़ात नागरिकांच्या मतांवर निवडून येऊन ग्रामपंचायत सदस्यांपासून मंत्रिपदापर्यंत गेलेल्या प्रत्येकानेच सध्या महाराष्ट्रातील बारमाही दुष्काळ असलेल्या पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या सारख्यांचा आदर्श घेण्याची गरज आहे. स्वतः 1 हजार 100 खाटांचं कोविड केअर सेंटर उभे करून, स्वतःचा खिसा आपल्या मतदारसंघातील कोरोनाग्रस्तांसाठी रिता करणाऱया आणि या कार्याला जगभरातून मदत मिळवून अनेकांचे श्वास वाचविणाऱया निलेश लंकेंचे कार्य सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहे. किमान इतके मोठे कोविड सेंटर नको मात्र आपल्या मतदारसंघात मदत मागायला येणाऱया नागरिकाला योग्य मार्गदर्शन आणि त्याला ऑक्सिजन पुरवून जगविणाऱयाला अटकाव न करता लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे, अशीच सामान्य जनभावना आहे.
युवा समिती सदस्यांनी व्यक्त केली नाराजी
एकंदर परिस्थिती हाताबाहेर जात आहे. लोक तडफडून मरत आहेत. स्वतंत्र विलगीकरण केंद्र स्थापन करूनही ऑक्सिजन अभावी सेवा देता येत नाही. याचा पाठपुरावा करण्यासाठी आज युवा समिती सदस्यांनीही बिम्सला भेट दिली. त्यांनाही असाच अनुभव आला. ऑक्सिजन बेडच्या प्रतीक्षेत रुग्ण, बाहेरगावी गेलेल्या वैद्यकीय संचालकांची उद्धट उत्तरे आणि ‘काय करायचे ते करून घ्या’ अशी बोलणी ऐकून त्यांना असहाय्य स्थितीत परत फिरावे लागले. याबद्दल युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके आणि मदन बामणे यांनी तरुण भारतला दूरध्वनी करून तीव्र नाराजी व्यक्त केली.









