पं. शुभदा पराडकर यांच्यासह देशभरातील 22 कलाकारांचा सहभाग : दिवसभराच्या प्रहरांनुसार राग प्रस्तुती : शास्त्रीय संगीत रसिकांसाठी पर्वणी
प्रतिनिधी / कुडाळ:
पद्मश्री वसंत देसाई शास्त्रीय संगीत महोत्सवाला येथील हॉटेल लेमनग्रास येथे सुरूवात झाली. सिंधुदुर्ग जिल्हय़ात पहिल्यांदाच होत असलेल्या या शास्त्रीय संगीत महोत्सवात ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर घराण्याच्या गायिका पं. शुभदा पराडकर यांच्यासह देशभरातले 22 कलाकार सहभागी झाले आहेत.
सलग सतरा तास ही मैफिल चालली. मिती एंटरटेनमेंटच्यावतीने आयोजित या मैफिलीमध्ये दिवसभराच्या प्रहरांनुसार राग प्रस्तुती करण्यात आली. शास्त्राrय संगीत रसिकांसाठी हा कार्यक्रम म्हणजे पर्वणीच ठरला.
संगीतकार पद्मश्री वसंत देसाई सिंधुदुर्गचे सुपुत्र. कुडाळ नजीकचे सोनवडे हे त्यांचे गाव. ‘गुंज उठी शहनाई’ या त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटातून त्यांची शास्त्राrय संगीतावरची पकड समजते. त्यांच्याच नावाने एखादा शास्त्रीय संगीत महोत्सव सिंधुदुर्गात घ्यावा, अशी कल्पना मयूर कुलकर्णी आणि सिद्धेश कुंटे या तरुणांच्या मनात आली आणि कुडाळमध्ये हा पहिला-वहिला महोत्सव घ्यायचे ठरले.
येथील हॉटेल लेमनग्रासच्या सभागृहात या महोत्सवाचा शुभारंभ ज्येष्ठ गायिका पं. शुभदा पराडकर यांच्या हस्ते सरस्वती देवी आणि गणेश यांच्या प्रतिमा पूजनाने आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आला. ज्येष्ठ रंगभूषाकार विलास कुडाळकर, संगीत शिक्षक राजन माडये, लेमनग्रासचे नीलेश सामंत, ज्येष्ठ दिग्दर्शक चंदू शिरसाट, मयूर कुलकर्णी, सिद्धेश कुंटे सहभागी झाले होते. उपस्थित बावीस कलाकारांनी गणेशाचे पूजन करून आशीर्वाद घेतले.
अशाप्रकारचा महोत्सव पहिल्यांदाच कुडाळमध्ये होत आहे. यामुळे परत एकदा अभिजात शास्त्राrय संगीत युवा पिढीमध्ये रुजविण्याच्या दृष्टीने हातभार लागेल, असे मयूर कुलकर्णी यांनी सांगितले. उद्घाटन सोहळय़ाचे प्रास्ताविक मयूर कुलकर्णी, तर सूत्रसंचालन उदय वेलणकर यांनी केले.
सहगायनाने मैफिलीचा श्रीगणेशा
पं. शुभदा पराडकर यांच्या शिष्या औरंगाबादच्या अदिती कोरटकर आणि सावनी गोगटे यांच्या सहगायनाने मैफिलीचा श्रीगणेशा झाला. त्यानंतर या दोघींनी राग बिलासखरी तोडीने आपल्या गायनाला सुरुवात केली. उपस्थित रसिक त्यांच्या गायनाने मंत्रमुग्ध झाले.
सादरीकरणात विविधता
या मैफिलीत ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका पं. शुभदा पराडकर यांच्यासह सत्येंद्रसिंह सोळंकी यांचे संतूरवादन, अभिषेक काळे, गौरी बोधनकर, मानसी कुलकर्णी, मुग्धा गावकर, ऋतुजा लाड, रोहित धाराप यांचे गायन तसेच यशवंत वैष्णव (एकल तबला वादन), ओंकार अग्निहोत्री व अभिनय रवंदे यांचे हार्मोनिअम सहवादन, यज्ञेश रायकर यांचे व्हायोलिन वादन, प्रसाद रहाणे यांचे सितार वादन अशा देशभरातल्या बावीस कलाकारांची कला रसिकांना अनुभवता आली.
संवादिनी साथ वरद सोहोनी, ओंकार अग्निहोत्री, अभिनय रवंदे व निनाद जोशी करणार असून तबला साथ तरूण लाला, यशवंत वैष्णव, रामकृष्ण करंबेळकर, संदीप पवार, सिद्धेश कुंटे व अद्वैत टाकळकर यांनी केली.









