प्रतिनिधी / कुडचडे
कुडचडे येथे सोशल डिस्टन्सिंगचे सध्या तीन तेरा वाजू लागले असून मिळेल तेथे भाजीविक्रेते, फळविक्रेते बिनधास्त व्यवसाय करत असल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊनच्या काळात कुडचडेत पदपथावर बसून कोणतेच व्यवहार होत नसले, तरी पालिका क्षेत्रात विविध ठिकाणी कोणतेच परवाने नसताना व्यवसाय करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. कुडचडे-काकोडा पालिकेचे अधिकारी यात गुंतलेल्यांना फक्त तंबी देत आले असून पालिकेकडून कोणतीच कारवाई होत नसल्याचेही दिसून येत आहे. तंबी दिल्यानंतर परत दोन दिवसांनी उपस्थित होऊन सदर विक्रेते आपला व्यापार सर्रास विकताना दिसतात.
कुडचडे येथील जुन्या भाजी मार्केटमध्ये अगोदरच दुकानासमोर एक व्यक्ती नीट उभी राहाण्याबाबत जागेची पंचाईत आहे. त्यात सदर ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग कशाप्रकारे पाळायचे याची चिंता लोकांना सतावत आहे. सदर अटीचे पालन होण्यासाठी तेथील विक्रेत्यांना लॉकडाऊनच्या काळात भाज्या विकण्यासाठी पालिकेने अन्य ठिकाणी जागा द्यावी. त्यामुळे लोकांना भाजीपाला घेणे सोयीस्कर होईल, असे मत बाजारात आलेल्या एका स्थानिक व्यक्तीने व्यक्त केले.
राज्यात काही बँकांना व्यवहार करण्यास परवानगी दिली आहे. कुडचडेत सध्या कार्यरत बँकांतर्फे पूर्ण काळजी घेण्यात येत आहे. काही बँकांत शिरल्याबरोबर सॅनिटायझर हातावर वापरण्यात येतो. पण रांगेत उभे राहाणाऱया लोकांना दुसऱयाचे सोडून द्या, स्वतःचेही पडलेले नसते असे दिसून येत आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे असे पोलीस वारंवार फेऱया मारून सांगत असतात. तरीही रांगेत उभे राहिलेले लोक पोलीस तेथून गेल्यावर पूर्वपदावर येतात.









