नंदगड दवाखान्यात जनतेची सोय : कूपनलिकेची केली दुरुस्ती
वार्ताहर /खानापूर
गेल्या अनेक वर्षांपासून नंदगड येथील दवाखान्यात पाण्याअभावी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पूर्णतः बंद झाली होती. त्याबाबत दैनिक तरुण भारतमध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याचा परिणाम म्हणून नुकताच कूपनलिका दुरुस्त करून घेण्यात आल्यामुळे आता पाण्याची सोय झाली आहे. सोमवारपासून कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
नंदगड व परिसरातील गावांतील लोक उपचारासाठी नंदगड येथील दवाखान्यात येतात. सुरुवातीला प्राथमिक आरोग्य केंद्र होते. 2012 साली या प्राथमिक केंद्राचा दर्जा वाढवून सामुदायिक आरोग्य केंद्र करण्यात आले. या दवाखान्यात पाच मुख्य डॉक्टरांची नियुक्ती आहे. पण त्यापैकी चार डॉक्टर कार्यरत आहेत. डॉक्टर वगळता इतर कर्मचाऱयांची संख्याही साधरणतः 45 पर्यंत आहे. या दवाखान्यात यापूर्वी महिन्याकाठी 25 ते 30 महिलांच्या प्रसूती होत होत्या. पण अलीकडे या दवाखान्यात पाण्याचा अभाव असल्याने केवळ पाच-दहाही प्रसूती होणे कठीण होऊन बसले आहे. अलीकडे कुटुंब नियोजन शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद करण्यात आली होती.
दवाखान्याच्या परिसरात एक कूपनलिका आहे. त्या कूपनलिकेला मोटार जोडून पाणी दवाखान्यासाठी वापरण्यात येत होते. परंतु एक वर्षापासून सदर कूपनलिकेचे पाणी बंद झाल्याने दवाखान्याला पाणी मिळणे कठीण झाले होते. येथील कर्मचाऱयांनी संबंधित ग्रामपंचायत, तालुका पंचायत व जिल्हा पंचायतीला यासंबंधी पत्रही लिहिले होते. परंतु याकडे दुर्लक्ष होत होते.
दैनिक तरुण भारतमध्ये महिन्याभरापूर्वी यासंबंधीचे सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. लागलीच असलेल्या कूपनलिकेमध्ये नवीन केसिंग पाईप घालून त्या ठिकाणी असलेली मोटार दुरुस्त करण्यात आली. आता मात्र मुबलक प्रमाणात पाणी मिळत आहे. दवाखान्यात पाणी आल्याने पुन्हा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे या भागातील जनतेला सोयीचे झाले आहे.









