वार्ताहर / कुंभोज
कुंभोज तालुका हातकणंगले परिसरात गेल्या आठ दिवसात झालेल्या मोठ्या प्रमाणातील पावसामुळे शेतकरी वर्गाचे नुकसान झाले असून कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी कुंभोज, हिंगणगाव, कवठेसार दानोळी, नेज, परिसरात भाजीपाला उत्पादनांचे मोठे शेती क्षेत्र आहे.
यामध्ये प्रामुख्याने टमाटो, ढबू मिरची, वांगी कोबी, फ्लावर, ग्रीन हाऊस आदी भाजीपाल्यांची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते, अचानक आलेल्या पावसामुळे कुंभोज परिसरातील जवळजवळ चारशे एकर क्षेत्रातील भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणात नष्ट झाली असून, ढब्बू व टमाटो पिके मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे गळून शेतीमध्ये पडली आहेत सदर शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून संपूर्ण पिके नष्ट झाल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे.
परिणामी शासनाने सदर पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी मदत करावी अशी मागणीही नुकसानग्रस्त शेतकऱ्यातून होत आहे. कुंभोज परिसरात जवळजवळ एक हजार एकर परिसरातील ऊस पिकांचे नुकसान झाले असून वादळी वारा व पावसामुळे ऊस पक्के जमीनदोस्त झाली आहेत. त्याचबरोबर नदीकिनारे असणाऱ्या ऊस पिकात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिल्याने सदर पिकांचे नुकसान होत असल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी सर्व नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे शासनाने त्वरित करून घेऊन सदर नुकसानग्रस्त शेतीचे रिपोर्टिंग शासनाकडे करावे व त्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी सर्वच पक्षसंघटना यांच्याकडून जोर धरत आहे.
सध्या कुंभोज परिसरात खासगी तत्त्वावरील काही साखर कारखान्यांच्या ऊस तोडणी टोळ्या दाखल झाल्या असून सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या साखर कारखान्यांच्या ऊस तोडणी टोळ्या दाखल होत आहेत. परिणामी मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे कुंभोज व परिसरातील ऊसतोडणी शेती ला घात नसल्याने एक महिना पुढे गेल्याची चर्चा शेतकरी वर्गातून होत आहे.









